महामार्गावर दोन महिन्यांत ७५ हजार वाहनचालकांवर कारवाई

महामार्गावरील उजव्या मार्गिकेतून जाण्यास बंदी असतानाही अवजड वाहनचालक हा नियम सर्रासपणे मोडतात आणि अपघाताना निमंत्रण देताते. या नियमाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. महामार्गावरील उजव्या मार्गिकेतून जाणाऱ्या अवजड वाहनचालकांविरोधात गेल्या दोन महिन्यांत केलेल्या कारवाईत ७५ हजार प्रकरणांची नोंद झाली आहे.

राज्यातील ज्या महामार्गावर येण्या-जाण्याच्या दोन्ही मार्गावर दोन मार्गिका आहेत, अशा मार्गावर जड-अवजड वाहने डाव्या मार्गिकेमधून न जाता उजव्या मार्गिकेमधून मार्गक्रमण करून वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. वाहनांनी मार्गिकेची शिस्त न पाळल्यामुळे आणि उजवीकडील मार्गिकेतून कमी वेगाने वाहन चालवल्यामुळे हलकी वाहनेही हीच संधी साधून वेगाने डाव्या मार्गिकेतून मार्गक्रमण करतात. परिणामी मार्गिकेची शिस्त न पाळल्यामुळे मोठय़ा प्रमाणात अपघात होत असून जीवितहानीही होते. तर वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागते. त्यामुळे अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जड-अवजड वाहनांनी डाव्या मार्गिकेमधून जाण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलिसांकडून र्निबध घालण्यात आले आहेत. त्याची सप्टेंबरपासून अंमलबजावणीला सुरुवात केली. यात सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०१९ मध्ये राज्यात महामार्गावर उजव्या मार्गिकेचा नियम न पाळणाऱ्या जड-अवजड वाहनांविरोधात केलेल्या कारवाईत ७५ हजार प्रकरणांची नोंद झाली असून १ कोटी ५१ लाख ४८ हजार रुपये दंड वसूल केला आहे.

बोरघाटात सर्वाधिक तक्रारी : बोरघाटात या नियमाला हरताळ फासण्यात येत असून दोन महिन्यांत तब्बल १४ हजार ३२८ प्रकरणे दाखल झाली आहेत. यात २८ लाख ६५ हजार रुपये दंड वसूल केल्याची माहिती देण्यात आली. तर मनोर, पळस्पे, शहापूर, खंडाळा, जालना येथेही मोठय़ा प्रमाणात जड-अवजड वाहनांविरोधात कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे.

कारवाईची आकडेवारी

पळस्पे- ६,६४१ प्रकरणे

मनोर- ५,८९० प्रकरणे

चिंचोटी- ४,११३ प्रकरणे

शहापूर- ३,६५१ प्रकरणे

चारोटी- २,६३२ प्रकरणे

खंडाळा- २,४९९ प्रकरणे

वडगाव- १,९४८ प्रकरणे

जालना- १,३५५ प्रकरणे

करंजी- १,५८९ प्रकरणे

मुळातच महामार्गावरील उजव्या मार्गिकेतून जाण्यास अवजड वाहनांना मनाई आहे. तरीही या नियमाकडे दुर्लक्ष केले जाते व अपघात घडतात. अशा वाहनांवर कारवाई केली जात असून दोन महिन्यात ७५ हजार प्रकरणांची नोंद झाली आहे. ही कारवाई सुरूच राहणार आहे.

– विजय पाटील, पोलीस अधीक्षक, महामार्ग पोलीस, (मुख्यालय)