गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शासनाचा निर्णय

गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावरून (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६) कोकणात जाणाऱ्या एसटी बस तसेच खासगी वाहनांची संख्या प्रचंड वाढते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी  ८ सप्टेंबरपासून अवजड वाहनांच्या वाहतुकीवर शासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.

पनवेल ते सावंतवाडी या मार्गावरून रेतीचे ट्रक, ट्रेलर्स व अन्य अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्यांची वजनक्षमता १६ टन किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा वाहनांवर ही बंदी असेल. दूध, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन व भाजीपाला या जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्यांना बंदी लागू राहणार नाही. ही बंदी गणेशोत्सव कालावधीपुरतीच असेल,  अशी माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रस्ता रुंदीकरण व रस्ता दुरुस्ती, कामकाज व साहित्य, माल इत्यादीची ने-आण करणाऱ्या वाहनांना मात्र बंदीतून वगळण्यात आले आहे.

बंदी पुढीलप्रमाणे

  • ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते ९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आणि १० सप्टेंबर रोजी रात्री ८ ते १३ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील.
  • १७ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते २० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक बंद असेल.
  • २३ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते २४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत वाहतूक बंद राहील.
  • ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते २४ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यंत वाळू, रेती आणि गौणखनिजांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णत: बंदी राहील.