टोलमुक्तीचा असाही फटका

आरे वसाहतीच्या परिसरांतर्गत येणारा मरोळ चेकनाका ते गोरेगाव चेकनाकादरम्यानच्या रस्त्यावरील टोल बंद झाल्यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर सुरू झाली आहे. त्यामुळे आरे वसाहतीमधील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. आरे वसाहतीसारख्या निसर्गरम्य परिसराची शांतता या वाहनांच्या वर्दळीमुळे भंग पावली असून या परिसरातील पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना वाहनांच्या भीतीने जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे.

आरे वसाहतीतील मरोळ चेकनाका ते गोरेगाव चेकनाका असा एकूण तब्बल सात किलोमीटरचा रस्ता आरे प्रशासनाकडून महापालिकेच्या अखत्यारीत आला आहे. या मार्गाने प्रवास करताना टोल भरावा लागत होता; परंतु टोल बंद झाल्यामुळे या मार्गावर गाडय़ांची वाहतूक वाढून या परिसरातील शांतता भंग पावली आहे. भर दुपारीही आरेत वाहनांची गर्दी असते. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. त्यातच गाडय़ांच्या वेगावर मर्यादा नसल्याने आणि गतिरोधक नसल्यामुळे वाहने सुसाट धावतात. त्यामुळे रस्त्यावर अनेक लहान अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. आरेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन राऊत यांनी आरेतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पूर्वी वर्दळीच्या वेळी अवजड वाहनांना बंदी घातली होती. मात्र कालांतराने त्यांची बदली झाल्यावर आरेत पुन्हा अवजड वाहनांची येजा सुरू झाली आहे.

आरेतील वाहतूक कोंडीमुळे इथल्या रस्त्यांवर असलेला प्राण्यांचा वावरही पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे. पूर्वी रस्ता ओलांडताना इथे सहज वन्यप्राणी भटकंती करताना दिसत. मात्र आता वाहनांच्या गर्दीमुळे हे प्रमाण जवळपास शून्यावर आले आहे. त्यामुळे आरे वसाहतीतील रहदारी नियंत्रित करण्यासाठी सिग्नल यंत्रणा, झेब्रा क्रॉसिंग, गतिरोधक बसवावे अशी मागणी स्थानिक रहिवाशी करत आहेत. आम्ही आरेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पत्र लिहून तशी मागणीही केली. मात्र आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिक नागरिक सुरेश सुब्रह्मण्यम यांनी सांगितले. याबाबत आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. व्ही. राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]

दिवेही नाहीत

आरे कॉलनीच्या रस्त्यांवर एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतके दिवे आहेत. त्यामुळे या वाढत्या रहदारीचा त्रास संध्याकाळी व विशेषत: पावसात रस्ता ओलांडताना नागरिकांना होतो.