नवा पूल बांधण्यासाठी रेल्वेचा २४ तासांचा ब्लॉक
डिसेंबर महिन्यात मध्य तसेच हार्बर मार्ग विस्कळीत होणार
मुंबईतील जुन्या पुलांपैकी एक असलेला हँकॉक पूल आता लवकरच इतिहासजमा होणार असून हा ब्रिटिशकालीन पूल पाडण्याची सुरुवात बुधवार, १८ नोव्हेंबरपासून होणार आहे. हे काम मुंबई महापालिका आणि मध्य रेल्वे करणार असले, तरी सध्या रेल्वे वाहतुकीत त्याचा काहीच अडथळा होणार नाही. मात्र डिसेंबर महिन्यात नवीन पूल बांधण्यासाठी २४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्या वेळी मध्य तसेच हार्बर मार्गावरील वाहतूक पूर्ण दिवस विस्कळीत राहण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेवर डीसी-एसी परिवर्तनादरम्यान हँकॉक पूल अडथळा ठरत होता. त्याच वेळी हा पूल पाडण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र पालिका व रेल्वे यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पूल पाडण्याचा मुहूर्त टळला होता. परिणामी पुलाजवळ रेल्वेगाडय़ांना ताशी १५ किमीची वेगमर्यादाही लावण्यात आली होती. हा पूल तब्बल १३५ वर्षे जुना आहे. त्यामुळे आता हा पूल पाडण्याच्या दृष्टीने महापालिका आणि रेल्वे यांचे एकमत झाले असून १८ नोव्हेंबरपासून या कामाला सुरुवात होणार आहे.
या पुलाचा रेल्वेच्या हद्दीतील भाग मध्य रेल्वे पाडणार असून महापालिकेच्या हद्दीतील भागाची जबाबदारी महापालिकेची आहे. हा पूल पाडून त्या जागी थोडा उंच नवीन पूल बांधण्यात येणार आहे.
त्यासाठी डिसेंबर महिन्यात मध्य रेल्वे २४ तासांचा विशेष ब्लॉक घेणार आहे. हा ब्लॉक सुटीच्या दिवशी घेण्याचा विचार असून प्रवाशांना कमीत कमी त्रास होईल, याकडे रेल्वे लक्ष पुरवणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले. या ब्लॉकदरम्यान मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील वाहतूक भायखळ्यापर्यंत, तर हार्बर मार्गावरील वाहतूक वडाळा रोड स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे.
तसेच लांब पल्ल्याच्या गाडय़ा दादर टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दिवा जंक्शन येथून चालवण्यात येतील.