काश्मीर खोऱ्यात भाजपचे सरकार आल्याने आता काश्मिरी पंडितांची घरवापसी सरकारने केली पाहिजे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.
काश्मिरी पंडितांनी खारघर येथे बांधलेल्या शारदा सदनाच्या उद्घाटनासाठी ते येथे आले होते. काश्मिरी पंडितांची ओळख असलेले हे पहिले सदन महाराष्ट्रात बांधण्यात आले आहे. यासाठी अडीच कोटी रुपये खर्च झाले असून, त्यासाठी १५ वर्षे लागली.
या वेळी अनेक काश्मिरी पंडितांनी २५ वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी काश्मिरींसाठी घेतलेल्या ठाम भूमिकेच्या आठवणी जागवल्या. जम्मू-काश्मीरमधील पंडितांची घरवापसी आता भाजप सरकारने केली पाहिजे, असे ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
आज महाराष्ट्रामध्ये दोन हजार काश्मिरी पंडितांची कुटुंबे व त्यांची एक हजार मुले उच्चस्तरीय शिक्षण घेत आहेत, हे बाळासाहेब ठाकरेंमुळेच शक्य झाले, असे चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी सांगितले.
या वेळी आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर व खासदार श्रीरंग बारणे, रायगड जिल्हाप्रमुख दिनेश पाटील, नवी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक आदी उपस्थित होते.