मुंबई : महामार्ग पोलिसांनी घेतलेल्या परीक्षेत दुचाकीस्वार सर्वात बेशिस्त असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या पाच महिन्यांत हेल्मेटसक्ती झुगारणारे १६ लाख दुचाकीस्वार दंडास पात्र ठरले. गेल्यावर्षी राज्यभर झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये ४८७८ जणांना जीव गमवावा लागला होता.

नवे वर्ष सुरू झाल्यावर महामार्ग पोलिसांनी नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू के ली. तसेच नियम पाळण्याबाबत जनजागृतीही सुरू के ली.  पाच महिन्यांनंतर के लेल्या कारवाईची आकडेवारी तपासण्यात आली तेव्हा सर्वाधिक दंड हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकीस्वारांवर झाल्याचे महामार्ग पोलिसांच्या लक्षात आले. या आकडेवारीनुसार हेल्मेटसक्ती झुगारण्याचे प्रमाण जास्त असलेल्या १० शहरांमध्ये विशेष उपाययोजना करावी लागेल, असे महामार्ग पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या दहा शहरांमध्ये मुंबईसह पुणे, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, औरंगाबाद, नागपूर, पिंपरी चिंचवड, मिरा-भाईंदर, जळगाव आदी शहरे मोडतात.

राज्यात हेल्मेटसक्ती झुगारणाऱ्यांमध्ये पुणे शहर पहिल्या क्रमांकावर आहे. दंड आकारून पैसे गोळा करणे हा महामार्ग वाहतूक पोलिसांचा उद्देश नाही. दुचाकीस्वारांना शिस्त लागावी जेणेकरून अपघात घडल्यास हेल्मेटमुळे त्यांचा जीव वाचू शके ल. त्यामुळे हेल्मेटसक्ती झुगारणाऱ्या दुचाकीस्वारांवर आक्रमकपणे कारवाई सुरू केल्याचे महामार्ग पोलीस दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक भूषणकु मार उपाध्याय यांनी स्पष्ट के ले.

पुणे शहरात सर्वाधिक कारवाई

’ पुणे शहरात गेल्या पाच महिन्यांत तब्बल साडेसात लाख दुचाकीस्वारांना हेल्मेटसक्ती झुगारल्याबद्दल ३७ लाख २८ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

’ मुंबईत तीन लाख ९० हजार दुचाकीस्वारांना १९ लाख ५० हजार रुपयांचा दंड झाला. ठाणे ७८ हजार, नवी मुंबई ६५ हजार, नागपूर ६२ हजार, पिंपरी चिंचवड ५२, मिरा-भाईंदर ३० तर औरंगाबाद शहरात १४ हजारांहून अधिक जणांवर कारवाई झाल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट के ले.