नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्हे
पुण्यात हेल्मेट ( संरक्षक शिरोकवच) सक्तीवरून वाद सुरू असतानाच आता दुचाकीच्या मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट घालणे सक्तीचे करण्यात आले आहे. दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनी हेल्मेट घातले नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश परिवह आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे नवीन वादास तोंड फुटण्याची शक्यता आहे.
पुण्यात हेल्मेट सक्तीवरून सध्या राजकारण सुरू झाले आहे. खाजगी कंपन्यांच्या भल्यासाठी ही सक्ती करण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. त्यातच परिवहन विभागाने शनिवारी परिपत्रक काढून दुचाकीवरील सहप्रवाशालाही हेल्मेट सक्तीचे केले आहे. मोटर वाहन कायद्याच्या कलम १२९ आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुचाकीवरील दोघांनी हेल्मेट वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सरकारची जबाबदारी आहे. त्यानुसार आता दुचाकी वाहन चालविण्यासाठी शिकाऊ अनुज्ञप्ती देतेवेळीच सबंधिताकडून हेल्मेट वापराबाबत बंधपत्र घेऊनच अनुज्ञप्ती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर नवीन दुचाकी विकत घेणाऱ्यांना दोन हेल्मेट देण्याचे दुचाकी उत्पादकांना बंधनकारक करण्यात आले असून त्याशिवाय दुचाकीची नोंदणी करू नये, असे आदेशच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

सेनेविरोधात नाराजी
या आदेशाने परिवहनमंत्री रावते व पर्यायाने शिवसेनेबद्दल शहरी तसेच ग्रामीण भागांत नाराजी वाढली आहे. विशेष म्हणजे राज्यात हेल्मेटसक्ती झाली तेव्हा आघाडी सरकारच्या विरोधात सेनेनेच विधिमंडळात आवाज उठविला होता आणि सरकारला ही सक्ती मागे घ्यायला लागली होती.

यापूर्वी आघाडी सरकारच्या काळात हेच लोक हेल्मेटसक्तीला विरोध करत होते. सध्या सुरू असलेली हेल्मेटसक्ती ही जनतेच्या सुरक्षिततेसाठी नसून ती हेल्मेटउत्पादक कंपन्यांच्या फायद्यासाठी आहे. हेल्मेटसक्तीला आमचा विरोध नाही. हेल्मेटच्या वापरामुळे दुचाकीस्वाराचा जीव वाचतो, हे देखील मान्य आहे. परंतु मुळात रस्ते नीट नसताना हेल्मेटसक्ती कशाला?
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष