News Flash

सर्वाधिक विनाहेल्मेट दुचाकीस्वार मुंबईत

हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती, सक्ती अशा वेगवेगळ्या उपायांनंतरही हेल्मेटच्या वापराबाबत वाहनचालक गंभीर नसल्याचे दिसत आहे.

मुंबई : हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती, सक्ती अशा वेगवेगळ्या उपायांनंतरही हेल्मेटच्या वापराबाबत वाहनचालक गंभीर नसल्याचे दिसत आहे. मुंबई महानगरात गेल्या पाच महिन्यांत हेल्मेट परिधान न के ल्याच्या ५ लाख ६५ हजार ५६१ गुन्हे नोंद झाले आहेत, हेल्मेट परिधान न करण्यात मुंबईकर आघाडीवर असून सर्वाधिक ३ लाख ९० हजार ६७८ जणांवर कारवाई झाल्याची माहिती महामार्ग पोलिसांकडून देण्यात आली.

दुचाकीचालकाबरोबरच त्यासोबत मागे बसून प्रवास करणाऱ्यानेही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. मात्र काही दुचाकीचालक हेल्मेट घालतात, तर सोबत प्रवास करणाऱ्याकडून मात्र दुर्लक्ष केले जाते. वाहतूक पोलिसांकडून करण्यात येणाऱ्या कारवाईचाही काही फायदा होत नसल्याचे दिसत आहे. एखादा अपघात झाला आणि चालकाने हेल्मेट घातले तर प्राण वाचतील अशी कारवाईमागील धारणा असते. परंतु त्याला अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात. २०१६ मध्ये राज्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली होती. त्याला मुंबईत काही प्रमाणात विरोध होतानाच पुणे, कोल्हापूर व अन्य भागांतूनही विरोध झाला होता. ऑगस्ट २०१६ मध्ये हेल्मेट नसलेला दुचाकीस्वार पेट्रोल पंपावर आल्यास त्याला इंधन दिले जाऊ नये, असा निर्णय परिवहन विभागाने घेतला होता. त्याला खुद्द दुचाकीस्वारांबरोबरच पेट्रोल पंप चालकांनीही विरोध केला. होणारा विरोध पाहता हा निर्णय मागे घेतला. त्यानंतर फक्त कारवाईचाच बडगा उचलण्यात आला. मात्र वारंवार कारवाईनंतरही दुचाकीस्वारांना हेल्मेटचे महत्त्व पटलेले नाही.

यंदाही आघाडी

जानेवारी ते मे २०२१ पर्यंत वाहतूक पोलिसांनी मुंबईत हेल्मेट न घातलेल्या ३ लाख ९० हजार ६७८ दुचाकीस्वारांवर कारवाई केली. त्यापाठोपाठ ठाणे शहरात ७८ हजार ३४६, नवी मुंबईत ६५ हजार ७०३ आणि मीरा-भाईंदर आणि वसई-विरारमध्ये ३० हजार ८३४ दुचाकीस्वार कारवाईच्या जाळ्यात अडकले. २८ कोटी २७ लाख ८० हजार ५०० रुपये दंड वसूल केल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली. मुंबईत विनाहेल्मेट वाहन चालवण्याची प्रकरणे अधिक असल्याने याच शहरातूनही दंड अधिक वसूल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 3:16 am

Web Title: helmet cyclists mumbai road highway ssh 93
Next Stories
1 विद्यापीठातील अस्थायी कर्मचाऱ्यांच्या विमा प्रश्न ऐरणीवर
2 इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करण्याचे आवाहन
3 बालकामगारविरोधी दिनानिमित्त खास खेळ
Just Now!
X