राज्यात दोन वर्षांत ९ हजार ६२१ दुचाकीस्वारांचा मृत्यू

दुचाकीचालक व त्यावरील सहकाऱ्यांना हेल्मेट न घालणे जिवावर बेतत आहे. हेल्मेट न घातल्याने राज्यात २०१७ व २०१८ मध्ये झालेल्या रस्ते अपघातांत एकूण ९ हजार ६२१ दुचाकीचालक व त्यावरील सहकाऱ्यांना मृत्यूला सामोरे जावे लागल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे. दोन वर्षांत दुचाकींच्या अपघातांत मोठी वाढ झाली असून ते कमी करण्यासाठी परिवहन विभागासह संबंधित सर्वच विभागांकडून प्रयत्न सुरू आहेत.

दुचाकीचालकाबरोबरच त्यासोबत मागे बसून प्रवास करणाऱ्यानेही हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. मात्र काही दुचाकीचालक हेल्मेट घालतात, तर सोबत प्रवास करणाऱ्याकडून मात्र दुर्लक्ष केले जाते. वाहतूक पोलिसांकडून कारवाई करूनही त्याचा काही एक फायदा मात्र होताना दिसत नाही. एखादा अपघात झाला आणि चालकाने किंवा सहकाऱ्याने हेल्मेट घातले तर प्राण वाचतील अशी कारवाईमागील धारणा असते. परंतु त्याला अनेक जण फाटाच देतात. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ९ हजार ६२१ जणांना रस्ते अपघातांत प्राण गमवावे लागले आहे. हेल्मेट नसल्यामुळेच हे जीव गेल्याचे निदर्शनास आले आहे. यात मोठी वाढही आहे. २०१७ मध्ये ४ हजार ३६९ चालक व सहकाऱ्यांचा मृत्यू झाला असतानाच २०१८ मध्ये हीच संख्या ५ हजार २५२ एवढी असल्याचे सांगण्यात आले.

पाच लाख चालकांवर कारवाई

दुचाकीचालकांकडून हेल्मेटचा वापर केला जात नसल्याने त्यांच्यावर जानेवारी २०१९ ते एप्रिल २०१९ या चार महिन्यांत कठोर कारवाई केल्याची  माहिती नुकतीच परिवहन विभागाने दिली. राज्यात सुमारे पाच लाख चालकांवर कारवाई केली आहे. मात्र हा धाक दुचाकीचालकांमध्ये यापुढेही कायम आहे का, हे पाहण्यासारखे असेल.