मुंबईमध्ये एका गतिमंद लहान मुलाला बसस्टॉपला बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अंकात मंत्रालयाजवळील एका बसस्टॉपला मानसिकदृष्ट्या अधु असणाऱ्या लहान मुलाला बांधून ठेवल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर या प्रकाराची दखल घेत पोलिस आणि सामाजिक संस्थांनी घटनास्थळी धाव घेत या पिडीत मुलाची सुटका केली. या मुलाचे नाव लाखन सावंत काळे असून त्याचे कुटुंब पदपथावरील पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम करतात. लाखनला सेरेब्रल पाल्सी आणि इपीलेप्सी या व्याधी जडल्यामुळे त्याला मानसिकदृष्ट्या अपंगत्व आले आहे. लाखन सध्या आपली आजी आणि १२ वर्षीय बहिणीबरोबर राहत असून कामावर जातेवेळी त्याची बहिण त्याला बसस्टॉपच्या खांबाला बांधून ठेवत असे. दरम्यान हा प्रकार उघडकीला आल्यानंतर मरीनड्राईव्ह पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन या मुलासह त्याच्या आजी आणि बहिणीला पोलिस ठाण्यात आणले. या मुलाचे वडील चार वर्षापूर्वी वारले असून, त्याची आईसुद्धा बेपत्ता झाली आहे. त्यामुळे आपल्यापरीने जमेल तितकी लाखनची काळजी घेत असल्याचे या मुलाच्या आजीने सांगितल्याची माहिती पोलिस उप-निरीक्षक एस.जी. फणसे यांनी दिली. मानसिकदृष्ट्या अपंगत्व आलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांकडून या मुलाला मदत मिळावी यासाठी पोलिसांकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत.