मुंबई : अंशत: टाळेबंदीसह अनेक निर्बंध लागू करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आणि करोना प्रतिबंधाच्या उपाययोजनांना संपूर्ण सहकार्य व पाठिंबा देत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जाहीर के ले. याचा फटका गरीब व मध्यमवर्गीयाला बसणार असल्याने त्यांना या कठीण परिस्थितीत तग धरता येईल, एवढी तरी आर्थिक मदत देणारे पॅकेज राज्य सरकारने द्यावे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

र्निबधांमुळे उद्योग, रोजगारावर परिणाम होईल. वीज बिल थकल्याने वीज जोडण्या तोडण्याची मोहीम हाती घेऊन महावितरणने चार ते पाच हजार कोटी रुपये ग्राहकांकडून वसूल केले आहेत. त्यामुळे आता या परिस्थितीत वीज जोडण्या कापण्याची मोहीम तातडीने स्थगित करण्यात यावी, अशी मागणीही फडणवीस यांनी के ली.

राज्य सरकारने लागू केलेल्या र्निबधांबाबत फडणवीस म्हणाले, राज्यात रविवारी ५७ हजारांहून अधिक नवीन करोना रुग्णांची नोंद झाली. ही परिस्थिती भयावह आहे. त्यामुळे भाजप नेते व कार्यकर्त्यांचे सहकार्य करोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी राहील. लसीकरण जास्तीत जास्त व्हावे, यासाठी कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेतील. पण करोनाचे नवीन प्रजातीचे विषाणू महाराष्ट्रातच का वाढत आहेत, फुप्फुसांवर ते गंभीर परिणाम करतात. सुरुवातीला लक्षणे दिसून येत नाहीत व रुग्ण गंभीर होतो, याबाबतही संशोधक व डॉक्टरांशी विचारविनिमय करून सरकारने जनतेला पुरेशी शास्त्रीय माहिती द्यावी.

मुंबई, पुणे ही महत्त्वाची शहरे आहेतच, पण त्याव्यतिरिक्त राज्यातील आरोग्य सेवा राज्य सरकारच्या अखत्यारीत असून सध्या ती अतिशय अपुरी आहे. ऑक्सिजन सुविधा असलेल्या खाटा, व्हेंटिलेटर्स व अन्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्या वाढविण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असे फडणवीस यांनी सांगितले. केंद्र सरकारने मदतीचे पॅकेज गेल्या वर्षी जाहीर केले व राज्याला जी मदत मिळाली, त्याचे तपशील आम्ही आधीच दिले आहेत. तरी आपली अकार्यक्षमता झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी करू नये,  असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.