शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. या मुद्यावरूनव आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी या मुद्य्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे.

“कसाबला बिर्याणी खायला घालणाऱ्या आणि याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेत बसल्यावर..आझाद काश्मीर मागणाऱ्या मेहक प्रभूला सोडून देणार, शर्जिलला पळून जायला मदत करणार आणि भारतरत्नांना मात्र आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणार? वा रे वा! महाराष्ट्राचे कारभारी लयभारी!” अशा शब्दांत ट्विट करून आशिष शेलार यांनी टीका केली आहे.

तसेच, “आपल्या देशातंर्गत विषयात नाहक नाक खूपसणाऱ्या परदेशी पाँप स्टारना रोखठोक उत्तर दिले म्हणून आता महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकरजी यांच्या ट्विटची चौकशी करणार असे भयंकर वृत्त आताच समजले.” असं म्हणत शेलार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

आशिष शेलार माध्यमांशी बोलताना म्हणाले, “या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? प्रश्न विचारायची वेळ आता आलेली आहे. आपल्या देशाच्या अतंरर्गत विषयात परकीयांनी बोलू नये. असं जर म्हटलं तर सचिन तेंडुलकर किंवा लता मंगेशकर यांच्या ट्विटवर चौकशी महाविकासआघाडीचे या सरकारमधील बसलेली मंडळी करणार, तशी मागणी करणार. पण या स्वतंत्र भारतात आझाद काश्मीरचा बॅनर घेऊन जर कुणी मेहक प्रभू उभी राहिली, तर तिची चौकशी बंद होणार तिची सुटका होणार. कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांचं समर्थन मिळाल्यावर, ज्या याकूबने मुंबईवर हल्ला केला देशावर हल्ला केला. त्याची शिक्षा माफ करा असं म्हणणाऱ्यांबरोबर शिवसेना सत्तेत बसणार. पण जे केवळ महाराष्ट्राचे भूषण नाही तर भारतरत्न आहेत. अशा लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांच्या ट्विटवर चौकशीची मागणी करणार आणि गृहमंत्री त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू असं म्हणणार, या पेक्षा संतापजनक आणि हीन दर्जाचं राजकारण या महाराष्ट्रात कुणी पाहिलं नाही. सगळ्यात मोठं दुर्देवं आहे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, त्यावेळी सचिन तेंडुलकर व लता मंगेशकर यांच्यावर चौकशीचा फेरा घाला याबद्दलची चर्चा होते. उद्धव ठाकरे उत्तर द्या..अशी आमची मागणी आहे.”

ट्विट करण्यासाठी सेलिब्रिटींवर मोदी सरकारकडून दबाव?; ठाकरे सरकार करणार चौकशी

तसेच, “मला वाटतं कुणी कोणाबद्दल काय ट्विट केलं पाहिजे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीचं ट्विट लता मंगेशकर व सचिन तेंडुलकर यांनी केलं. त्यामध्ये कुणाची बाजू व कुणाच्या विरोधात न म्हणता आमच्या अंतर्गत विषयात बोलू नका, आम्ही एक आहोत. आम्ही एक आहोत म्हटल्यावर यांच्या पोटात दुखण्याची गरजच काय? आम्ही एकाच दिलाने विचार करू, आमचं आम्ही बघून घेऊ हे म्हटल्यावर काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व राजू शेट्टी यांना त्रास का होतो आहे. या सर्वांची ही इच्छा आहे का? आमच्या शेतकऱ्यांचे व आमच्या देशाताली प्रश्नावर परदेशात चर्चा व्हावी. अजून नेहरू मनोवृत्तीतून काँग्रेस बाहेर पडली नाही आणि आज काँग्रेसबरोबर शिवसेना देखील मिळालेली आहे.” असं देखील शेलार यांनी यावेळी बोलून दाखवलं.

झूम मीटिंदरम्यान काँग्रेसकडून सेलिब्रिटींच्या ट्विटचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सेलिब्रिटींवर दबाव टाकण्याता आला होता याबद्दल माहिती घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली. त्यावर अनिल देशमुख यांनी गुप्तहेर विभाग यासंबंधी तपास करणार असल्याची माहिती दिली आहे. यावेळी खासकरुन अक्षय कुमार आणि सायना नेहवालच्या ट्विटचा उल्लेख करण्यात आला. दोन्ही ट्विटमध्ये असणाऱ्या साधर्म्य आश्चर्यकारक असल्याचं सांगण्यात आलं.

“भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत”

अमेरिकन पॉपस्टार रिहानानं शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केल्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं होतं. परराष्ट्र मंत्रालयाच्या उत्तरानंतर देशातील कला व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ट्विट करत देशाच्या अखंडतेचा पुनरुच्चार केला होता. यात भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनीही ट्विट केलं होतं.