१०० डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचा गट रवाना

केरळ समाजाशी निगडित संस्थांसह शहरातील विविध सामाजिक संस्थांनी मुंबईतून मदतीचा ओघ सुरू केला आहे.

पुरामुळे शहरे आणि गावांचा संपर्क तुटला असून अडकलेल्या नागरिकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी मोठय़ा प्रमाणात डॉक्टरांची आवश्यकता असल्याने महाराष्ट्र सरकारतर्फे मुंबईतील जे.जे. आणि पुण्यातील ससून रुग्णालयातील सुमारे १०० डॉक्टर आणि निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांचा गट सोमवारी सकाळी वायुदलाच्या दोन विमानांतून केरळला रवाना झाले. विमानांमधून अत्यावश्यक औषधांचा साठा, खाण्याचे पदार्थ यासोबत केरळ सरकारने मागणी केलेल्या गोष्टी पाठविल्या आहेत.

प्रथम हे विमान त्रिवेंद्रम एअरपोर्टला उतरून त्यानंतर हे डॉक्टर कोचीवरून विविध गावांमध्ये जाणार आहेत. पूरपरिस्थितीनंतर साथीचे आजार बळावण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. तेव्हा या आजारावर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी हे डॉक्टर कार्यरत असतील.

केरळ समाजाशी निगडित विविध सामाजिक संस्थांनी आत्तापर्यंत सुमारे एक कोटी रुपये केरळ राज्य सरकारला आर्थिक मदत म्हणून पाठविलेत. वाशी, वसई, चेंबूर भागांतील केरळ समाजाने खाण्यापासून कपडय़ांपर्यंत विविध वस्तू जमा केल्या आहेत.

यातील १८ ट्रक सामान येत्या रविवारी विजिस या जहाजाच्या माध्यमातून केरळला रवाना केले जाईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये ४६ टन सामान ट्रकमधून रस्त्यामार्गे पाठविले जाईल.

केरळ सरकारकडून सामानापेक्षा आर्थिक निधीची मागणी केली जात असल्याने केरळ समाजासह शहरातील अन्य नागरिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन आम्ही करत आहोत, असे माकपचे मुंबई शहर समितीचे सदस्य के.के. प्रकाशन यांनी सांगितले.

मुंबई डबेवाले संघटना आणि पेपर आणि पार्सल संस्था यांच्या वतीने प्रथमोपचाराची औषधे आणि अन्नधान्य मंगळवारी केरळला पाठविले जाईल. तसेच सोमय्या महाविद्यालय आणि माजी विद्यार्थ्यांकडून अन्नधान्य, औषधे, कपडे आदी बाबी मंगळवारी रेल्वेतून पाठविले जाईल.

सागरी संघटनांकडून मदत

‘मेरिटाइम असोसिएशन ऑफ शिपओनर्स मॅनेजर्स अँड एजंट्स’ (मास्सा), ‘द मेरिटाइम युनियन ऑफ इंडिया’ (एमयूआय) आणि ‘नॅशनल युनियन ऑफ सीफेर्स ऑफ इंडिया’ (एनयूएसआय) या तीन सागरी संघटनांनी प्रत्येकी दहा लाख असे एकूण मिळून तीस लाख रुपये केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या आपत्ती साहाय्यता निधीला देण्याचे जाहीर केले आहे. याशिवाय, हाँगकाँगच्या अँग्लो ईस्टर्न शिपिंग ग्रुपनेही ३५ लाख रुपयांचा मदतनिधी जाहीर केला आहे. केवळ आर्थिक मदत करण्यापुरत्या या सागरी संघटना मर्यादित राहिलेल्या नाहीत. ‘नॅशनल युनियन ऑफ सीफेर्स ऑफ इंडिया’चे कोचीतील कार्यालय शोधकार्य आणि पुनर्वसनाच्या कार्यात स्थानिक प्रशासनाला २४ तास सहकार्यही करत आहेत.

राज्यपालांचे आवाहन

केरळमधील पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना केले. विद्यापीठ व महाविद्यालयांनी निधी संकलन करून पंतप्रधान सहायता निधीला मदत करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली आहे.