मुंबई : विद्यापीठाच्या परीक्षा व पुढील वर्गातील प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने मदतवाहिनी सुरू केली आहे. विद्यापीठाच्या परीक्षा, मूल्यमापन आणि पुढील शैक्षणिक वेळापत्रकाबाबत शासनाने नुकतेच आदेश दिले आहेत. याबाबत विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी ) आणि राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी मदतवाहिनी सुरू करण्याचे आदेश विद्यापीठांना दिले होते. त्यानुसार मुंबई विद्यापीठाची मदतवाहिनी कार्यरत झाली आहे. त्याचप्रमाणे विद्यापीठ परीक्षा कशा घेणार, प्रवेश प्रक्रिया कशी असेल याबाबत सध्या एक कृती योजना तयार करण्यात येत आहे. यामध्ये प्रत्येक विद्याशाखेनुसार सविस्तर तपशील जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा व प्रवेशाबाबत काही मार्गदर्शन हवे असल्यास मदतवाहिनीशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे. संपर्क क्रमांक- ९६१९०३४६३४ व  ९३७३७००७९७;  ईमेल : examhelpline@mu.ac.in. दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी  info@idol.mu.ac.in या ईमेलवर संपर्क साधावा.