News Flash

औषधाअभावी हिमोफिलीयाचे रुग्ण त्रस्त

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही आरोग्य विभाग सुस्त!

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| संदीप आचार्य

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही आरोग्य विभाग सुस्त!

जखम झाल्यानंतर रक्ताची गुठळी न होता रक्त वाहत राहण्याचा गंभीर आजार असलेल्या हिमोफिलियावरील औषधांची तात्काळ खरेदी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी दिलेले आदेश अजूनही बासनातच आहेत. अद्यापि आरोग्य विभागाकडून या औषधांची खरेदीच करण्यात आली नाही. परिणामी औषधाअभावी राज्यातील हिमोफिलीयाचे हजारो रुग्ण त्रस्त झाले आहेत.

हिमोफिलीयाच्या रुग्णांमध्ये रक्तामध्ये गुठळी होण्यात अडचण असल्यामुळे त्यांना फॅक्टर आठ, नऊ तसेच थिबा आदी औषधांची आवश्यकता असून यासाठी महिन्याकाठी किमान तीस हजार रुपये खर्च येत असतो. ही औषधे अत्यावश्यक या सदरात येत असल्यामुळे आरोग्य विभागाने दोन वर्षांपूर्वी रुग्णांना ही औषधे मोफत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यात नाशिक, अमरावती, ठाणे, सातारा, नांदेड, नागपूर व जळगाव अशा सात ठिकाणी रुग्णांना ही औषधे देण्याची व्यवस्था करण्यात आली. तथापि आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे तसेच राज्याच्या औषध खरेदीची जबाबदारी हाफकिन महामंडळाला दिल्यापासून औषधपुरवठय़ात दिरंगाई सुरू झाली. याचा मोठा फटका रुग्णांना बसू लागला. ‘हिमोफिलीया सोसायटी ऑफ इंडिया’चे सचिव अजय पालंडे यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ दहा कोटींच्या औषध खरेदीचे आदेश जारी केले. नियमित खरेदी होईपर्यंत हिमोफिलीयाच्या रुग्णांसाठी तात्काळ औषध खरेदीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले त्याला दोन महिने उलटले. त्यानंतर १८ डिसेंबर रोजी आरोग्य विभागाने याबाबतचे आदेश जारी केले, मात्र अद्यापपर्यंत खरेदी नेमकी कशी करायची यावरून आरोग्य विभागाचा घोळ सुरू आहे. यासाठी पुन्हा सुधारित शासन आदेश मिळावा म्हणून पत्र पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हिमोफिलीयाच्या रुग्णांना आवश्यक औषधांचा नियमित पुरवठा करण्याचे आदेश उच्च न्यायालयानेही दिले असताना आरोग्य विभागाकडून मात्र वेळकाढू धोरण अवलंबिले जात आहे. आरोग्य विभागाने हाफकिन महामंडळाकडे ३६ कोटींच्या औषध खरेदीची मागणी नोंदवली असून त्याच्या निविदाही जाहीर झाल्या आहेत. तथापि ही औषधे प्रत्यक्षात उपलब्ध होण्यासाठी किमान दोन महिने लागणार असल्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी तातडीने दहा कोटींच्या औषध खरेदीचे आदेश दिले होते, असे अजय पालंडे यांनी सांगितले.

राज्यात हिमोफिलीयाचे सुमारे ५,७०० रुग्ण असून या रुग्णांना वेळेत औषधे मिळणे गरजेचे आहे. या रुग्णांना जखम झाल्यास रक्ताची गुठळी होऊन खपली धरली जात नाही व रक्त वाहतच राहाते हे लक्षात घेता अशा रुग्णांना युद्धपातळीवर औषध मिळणे गरजेचे असते. अलीकडेच अमरावती येथे हिमोफिलीयाचे औषध उपलब्ध नसल्यामुळे एक रुग्ण नागपूर येथे गेला व तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे हिमोफिलीया सोसायटीचे म्हणणे आहे. पालंडे यांच्या म्हणण्यानुसार आरोग्य विभागाच्या बहुतेक केंद्रांमध्ये अत्यावश्यक फॅक्टर  नसल्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत. त्यातच महाराष्ट्रात मोफत औषधे मिळत असल्यामुळे गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली आदी बाहेरच्या राज्यांतूनही मोठय़ा प्रमाणात रुग्ण येत असतात हे लक्षात घेऊन पुरेशी औषध खरेदी होणे आवश्यक असल्याचे हिमोफिलीया सोसायटीचे म्हणणे आहे.

हिमोफिलीया रुग्णांना लागणाऱ्या थिबा व फॅक्टर नऊ या औषधांची टंचाई आहे. काही ठिकाणी ही औषधे उपलब्ध नाहीत. मात्र येत्या दोन दिवसांत औषधे उपलब्ध होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.    – डॉ. संजीव कांबळे, आरोग्य संचालक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 1:23 am

Web Title: hemophilia medicine
Next Stories
1 मृतांचा आकडा अकरावर
2 गृहशिक्षणाकडे पालकांचा कल वाढणार
3 मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरहीभरतीची फाइल बासनातच!
Just Now!
X