माहुल परिसरातील एका घरात ‘हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम’च्या साहाय्याने गांजाची लागवड करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या गांजाची विक्री करणाऱ्या तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली असून, मूळ आरोपी फरार आहे.

निखिल शर्मा (२६) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून तो या मार्गाकडे वळला. माहुल परिसरात तो खांद्याला बॅग अडकवून संशयतरीत्या फिरताना पोलिसांना दिसल्याने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या पथकाने त्याला अडवले. मात्र, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली. झडतीत त्याच्याजवळ एक किलो गांजा आणि ५४ ग्रॅम एमडी सापडले. सुमारे तीन लाख रुपये किमतीचे हे अमलीपदार्थ होते. निखिल याने हा गांजा मित्राच्या घरातच ‘हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम’च्या साहाय्याने उत्पादित केल्याची माहिती पोलिसांना दिली.

ही माहिती मिळताच पथकाने तात्काळ माहुल परिसरातील पालव बाग परिसरातील घरावर छापा घातला. या छाप्यात ‘हायड्रोपोनिक ग्रो सिस्टम’चे तीन तंबू, कुंडय़ा, एलईडी दिवे, टायमर यंत्रणा, पीएच सॉइल टेस्टर, आद्र्रता मापक, हायड्रोपोनिक न्युट्रियंट्स, गांजाच्या वेगवेगळ्या प्रजातीच्या बिया असे सहा लाख रुपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. निखिलच्या फरार मित्राने एका संकेतस्थळाच्या माध्यमातून गांजा उत्पादनासाठी आवश्यक साहित्य, केमिकल्स, अमलीपदार्थ मागविले होते, अशी माहिती प्रभारी पो.निरीक्षक अशोक खोत यांनी दिली. त्याच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.