* दिल्ली बलात्कार प्रकरणास एक महिना  
* मुंबईतल्या वाटेवरही काचाच  
*  महिला अत्याचार अखंड सुरूच
बरोबर महिनाभरापूर्वी ‘ती’ची सकाळ नेहमीप्रमाणेच उगवली होती. दिवसभराचा ‘ती’चा नित्यक्रमही सुरू झाला होता. सायंकाळी मित्राबरोबर सिनेमा पाहण्याचा बेतही ‘ती’ने घरात जाहीर करून टाकला होता. मात्र, ‘त्या’ रात्री आपल्यापुढे काय वाढून ठेवलेय याची तीळमात्रही जाणीव ‘ती’ला नव्हती. नंतर जे झाले ते आपल्यासमोर आहे. ‘ती’ तर इहलोक सोडून गेलीच, परंतु आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात अनेकांच्या मनात द्वेषाची, त्वेषाची ज्योत (की मेणबत्ती?) पेटवून गेली. दिल्लीतील बलात्काराच्या ‘त्या’ नृशंस घटनेला बुधवारी बरोबर एक महिना झाला. मात्र, या काळातही देशाच्या कानाकोपऱ्यातही बलात्काराच्या, महिला अत्याचाराच्या घटना घडल्याच. पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्रही महिला अत्याचाराच्या या घटनांमध्ये मागे नाही हे दुर्दैव. राजधानी मुंबई ही महिलांसाठी दिल्लीपेक्षा अधिक सुरक्षित समजली जाते. मात्र, मुंबईतही या घटना वरचेवर घडताना दिसत आहेत. एकंदर दिल्लीच्या घटनेनंतरही एक समाज म्हणून आपण नापासच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मॉडेलवर बलात्कार : चित्रपट निर्माता अटकेत
एका मॉडेलवर बलात्कार केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी एका चित्रपट निर्मात्याला अटक केली.मूळ पुण्याची असलेली ही मॉडेल चित्रपटात काम मिळविण्यासाठी मुंबईत आली होती. गोरेगाव येथे भाडय़ाने फ्लॅट घेऊन ती राहत होती. रमेश सिंग हा चित्रपट निर्माता असल्याने एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिने त्याच्याशी संपर्क केला होता.
 शनिवारी सिंग याने ओशिवरा येथे तिला भेटायला बोलावले. तेथील एका मॉलमध्ये दोघांनी एकत्र जेवणही केले. चित्रपटाचा अर्थपुरवठादार दहिसरला राहतो, असे सांगत त्याला भेटण्यासाठी तो या मॉडेलला घेऊन दहिसरला जाण्यासाठी निघाला. मात्र त्याने तिला लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने कुटुंबीयांच्या मदतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. ओशिवरा पोलिसांनी त्याला मंगळवारी रात्री अटक केली. त्याला १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
भाभा रुग्णालयात डॉक्टरकडून विनयभंग
कुर्ला येथील भाभा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या एका महिलेचा विनयभंग करणाऱ्या डॉक्टरला बुधवारी पोलिसांनी अटक केली. कुर्ला येथे राहणारी ही २७ वर्षीय विवाहित महिला तपासणीसाठी सोमवारी सकाळी भाभा रुग्णालयात आली होती. तेथे तपासणीदरम्यान रुग्णालयातील अस्थिव्यंग्यतज्ज्ञ डॉक्टर विवेक माने (३५) याने तिच्याशी अश्लील वर्तन केले. तसेच तिला आपल्यासोबत येण्याचा प्रस्तावही दिला. या प्रकाराने घाबरलेली ही महिला तात्काळ घरी गेली. पतीला तिने हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी बुधवारी कुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून कुर्ला पोलिसांनी डॉ. माने यास अटक केली.
मतिमंद मुलीवर नातेवाईकाकडून बलात्कार
गोरेगाव येथील एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर बलात्कार करणाऱ्या फळविक्रेत्यास पोलिसांनी अटक केली आहे. मूलचंद गुप्ता असे या आरोपीचे नाव असून तो या मुलीचा नातेवाईक आहे. ही मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. गोरेगाव येथे राहणाऱ्या या १३ वर्षीय मतिमंद मुलीच्या वडिलांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. याच ठिकाणी मूलचंद गुप्ता (५०) याचाही फळविक्रीचा व्यवसाय आहे. या मुलीला त्रास सुरू झाल्यानंतर तिला वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा ती गर्भवती असल्याने निष्पन्न झाले. तिच्या जबानीत तिने मूलचंद गुप्ता हा आपल्याला घरात नेऊन बलात्कार करीत असे, असे सांगितले. तिचे आईवडील नसताना तो तिला फळ देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून तिच्यावर बलात्कार करीत असे.

विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोणत्याही घटनेच्या स्मृती टिकवण्यासाठी आपल्याकडे कार्यक्रम आखण्याची पद्धत आहे. तद्वतच बुधवारी दिल्लीतील त्या घटनेच्या मासिक स्मृती जागवल्या गेल्या. जमशेदपुरातील महिला महाविद्यालयाने महिला हक्कांविषयक अभ्यासक्रम राबवण्याची घोषणा केली तर कर्नाटक सरकारने बलात्कारासारख्या गुन्ह्य़ाच्या विरोधात असलेल्या प्रचलित कायद्यांत सुधारणा करून बलात्काऱ्यांना कठोर शिक्षा होईल अशी तरतूद करण्याचा संकल्प सोडला. गोवा सरकारने राज्यातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वांची आखणी केली आहे.