शेतकऱ्यांच्या या नजरेतील वेदना खूप काही सांगून जातात. देशाचा गाडा चालवणारा हा बळीराजा आज त्याच्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला आहे. खेड्यापाड्यांतून हजारोंच्या संख्येने शेतकरी रक्ताळलेले पाय घेऊन मुंबईत दाखल झाले आहेत. आपल्या व्यथा, मागण्या सरकारदरबारी मांडण्यासाठी त्यांनी १८० किलोमीटरची पायपीट केली. यात मुंबईकर किंवा दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये याचीही बळीराजाने पुरेपूर काळजी घेतली. या शांततापूर्ण मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याची एक व्यथा आहे.

राधाबाई किसन गागोंडे


नाशिकच्या दिंडोरीमधील दहिवी गावात राहणाऱ्या या ६५ वर्षीय राधाबाई गागोंडे. शेतकरी मोर्चात सहभागी होत सहा दिवस त्यांनी पायपीट केली. एक एकर वन जमिनीचे हस्तांतरण त्यांच्या नावे व्हावं, अशी त्यांची मागणी आहे. गेल्या दोन दशकांपासून राधाबाई त्या जमिनीवर काम करत आहे. ‘इतरांच्या शेतात काम करण्यात मी माझं आयुष्य व्यतित केलं. माझ्या नातवांच्या शिक्षणासाठी आणि किमान त्यांना चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी ही धडपड करतेय,’ असं त्या म्हणाल्या.

हिरामण वाघमारे


नाशिकच्या सुहाना तालुक्यातील चिकडी गावात राहणारे हे ४६ वर्षीय हिरामण वाघमारे. ‘विहिर किंवा बोअरवेलसाठी माझ्याकडे पैसे नाहीत. शेतमजूर असल्याने दिवसाला अवघे ५० ते १०० रुपये कमावतो,’असं त्यांनी सांगितलं. गेल्या कित्येक दशकांपासून त्यांच्यासारखे इतर शेजमजूर जे दिवसरात्र शेतात राबतायत, त्यांच्या नावावर वनजमिनीचे हस्तांतरण झाल्यास कर्ज तरी मिळू शकेल अशी त्यांची आशा आहे. कर्ज मिळाल्यास सिंचनासाठी काही प्रयत्न करता येईल, या अपेक्षेने सहा दिवस पायपीट करत ते मुंबईला आले आहेत.

मंदा पवार


नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पंडाना गावात राहणाऱ्या या मंदा पवार. वनजमिनीचे हस्तांतरण व्हावे आणि सार्वजनिक वितरण प्रणालीतही बदल व्हावे अशी ४५ वर्षीय मंदा पवार यांची मागणी आहे. ‘१० एकर जमिनीवर माझं संपूर्ण कुटुंब शेतमजूर म्हणून राबतंय. आमच्याकडे गुंतवणुकीसाठी ना भांडवल आहे, ना वीज, ना पाणी, मग शेती करायची तरी कशी आम्ही?’ असा प्रश्न त्या विचारत आहेत. जमिनीचे हस्तांतरण झाल्यास वीज, पाणी या गरजा तरी पूर्ण होतील, अशी त्यांना आशा आहे. पवार यांची दोन्ही मुलं शेजमजूर म्हणून काम करत असून दर दिवसा फक्त २०० रुपये कमावतात.

राजेभाऊ राठोड


परभणीतल्या सुरपिंपरी गावात राहणारे हे राजेभाऊ राठोड. सरकारने ३४ हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ४२ वर्षीय राजेभाऊ यांना खूप आनंद झाला. पण त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ‘२०१२ मध्ये मी १ लाख ८० हजार रुपयांचं पीककर्ज घेतलं. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे मी ते कर्ज फेडू शकलो नाही. माझी तीन एकरांची जमीन पडीक आहे आणि मला शेतीतून नफाच मिळत नाहीये,’ अशी व्यथा त्यांनी मांडली.

खेडापाड्यांतून आलेल्या या शेतकऱ्यांचा टाहो आता मायबाप सरकार ऐकणार का, हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.