News Flash

रेल्वेत खाद्यपदार्थाची छुपी दरवाढ

‘आयआरसीटीसी’कडे कंत्राटदारांविरोधात सहा महिन्यांत हजारांवर तक्रारी

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘आयआरसीटीसी’कडे कंत्राटदारांविरोधात सहा महिन्यांत हजारांवर तक्रारी

लांब पल्ल्यांच्या गाडय़ांमध्ये खाद्यपदार्थाच्या मूळ किमतीपेक्षा अधिक दर लावून प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या कंत्राटदारांविरोधात तक्रारींची संख्या वाढली आहे. याविरोधात प्रवाशांनी आयआरसीटीसीकडे तक्रारी केल्या असून रेल्वे स्थानकातील आयआरसीटीसीच्या फूड मॉलमधील खाद्यपदार्थावर जादा दर आकारले जात असल्याच्या तक्रारीही प्राप्त होत आहेत. गेल्या सहा महिन्यांत विविध प्रकारच्या एक हजार १३७ तक्रारी आयआरसीटीसीकडे आल्या असून गेल्या वेळच्या तुलनेत त्यात चौपटीने वाढ झाली आहे. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत अशा प्रकारच्या केवळ ५७३ तक्रारी आल्या होत्या.

रेल्वे प्रवासात प्रवाशांची गैरसोय होऊ  नये म्हणून आयआरसीटीसीकडून (इंडियन रेल्वे कॅटिरग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपरेरेशन)कंत्राटदारांमार्फत लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये खाद्यपदार्थ सेवा पुरवली जाते. खाद्यपदार्थाच्या किमतींवर आयआरसीटीसीकडून शिक्कामोर्तब केले जाते आणि त्यांना काही अटीही घातल्या जातात. मात्र कंत्राटदार कर्मचाऱ्यांकडून त्याचे सर्रास उल्लंघन केले जाते. आयआरसीटीसीकडे एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ पर्यंत विविध प्रकारच्या दोन हजार १५० तक्रारी आल्या. यामध्ये सर्वाधिक तक्रारी खाद्यपदार्थासाठी ठरलेल्या रकमेऐवजी जादा दर आकारल्यासंबंधी आहेत. त्याविरोधात एक हजार ८५ तक्रारी करण्यात आल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. खाद्यपदार्थाचा दर्जा आणि त्याच्या परिमाणाबाबतही प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दर्जा आणि परिमाण योग्य नसल्याबाबत ४६८ तक्रारी करण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये देण्यात येणारी सेवा ही नेहमीच उत्तम असल्याचा दावा केला जातो. हा दावाही कितपत योग्य आहे हे आयआरसीटीसीकडे आलेल्या तक्रारींवरूनच स्पष्ट झाले आहे. या सेवेविरोधात प्रवाशांनी ४६६ तक्रारी केल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील खाद्यपदार्थ, त्यांचा दर्जा, कर्मचाऱ्यांची वर्तणूक याविरोधात तक्रारींचा सूर प्रवाशांनी लावला असतानाच रेल्वे स्थानकात  खाद्यपदार्थाच्या फूड मॉल, फूड कोर्ट विरोधातही तोच सूर लावण्यात आला आहे. आयआरसीटीसीकडूनही काही रेल्वे स्थानकांवर फूड मॉल, फूड कोर्ट कंत्राटदारांना चालविण्यासाठी देण्यात येतात. यातील कर्मचाऱ्यांकडूनही खाद्यपदार्थावर जादा दर आकारणी करतानाच पदार्थाचा दर्जा व परिमाणही नीट राखला जात नाही. जादा दर आकारणीविरोधात ५२, पदार्थाचा दर्जा व परिमाणाबाबत ४८ तर सेवा आणि वॉटर वेंडिंग मशीन नीट नसल्याच्या २८२ तक्रारी आयआरसीटीसीकडे आल्या आहेत. आयआरसीटीकडे लांब पल्ल्याच्या गाडय़ा आणि फूड मॉलमधील खाद्यपदार्थ तसेच कर्मचाऱ्यांच्या वर्तवणुकीबद्दल आलेल्या तक्रारींचीही दखल घेण्यात आली आहे. दंड आकारतानाच समुपदेशन आणि सक्त ताकीद आयआरसीटीसीटीकडून देण्यात आली आहे. सहा महिन्यांत दोन हजार ७०५ तक्रारींवर अंमलबजावणीही केली आहे. प्रवाशांनी ट्वीटरद्वारेही केलेल्या तक्रारींचाही यात समावेश असून त्यांना तक्रारींवर अंमलबजावणी केल्याचे रीट्वीट करून सांगण्यात आले आहे.

एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ पर्यंत लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधील आणि रेल्वे स्थानकातील फूड मॉलमधील खाद्यपदार्थाचा दर्जा, कर्मचाऱ्यांची वर्तवणूक आणि अन्य तक्रारी मिळून दोन हजार ७३ तक्रारी आल्याचे सांगितले.

प्रवाशांकडे बक्षिशीची मागणी

लांब पल्ल्याच्या गाडय़ांमधून प्रवास करताना कंत्राटदार कर्मचाऱ्यांकडून पदार्थाच्या मूळ किमतीव्यतिरिक्त जादा दराची आकारणी केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. त्याचबरोबर टीप्सचीही मागणी केल्याचे अजब प्रकार प्रवाशांबाबत घडत असल्याचे समोर आले आहे. एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ मध्ये ३२ तक्रारी, तर एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ मध्ये टीपविरोधात ३७ तक्रारी आयआरसीटीसीकडे आल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 1:56 am

Web Title: hidden cost increase in railways food
Next Stories
1 मूलभूत अधिकाराला बाधा न आणता पुरस्कार द्या!
2 उपनगरीय रेल्वेला महाराष्ट्र सुरक्षा मंडळाच्या १,६०० जवानांचे बळ?
3 ‘व्हिवा लाऊंज’मध्ये पूनम महाजन यांच्याशी गप्पा
Just Now!
X