प्रसाद रावकर

गळतीचा शोध घेत असलेले पालिका कर्मचारीही बुचकाळय़ात; राजकारण्यांच्या ‘वैनगंगा’ इमारतीला पुरवठा होत असल्याचा संशय

शहरात अनेक भागांत अपुऱ्या पाणीपुरवठय़ाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच वरळीतील जयवंत पालकर मार्गाजवळ डोंगर उतारावर सपाटीकरण करून बसविण्यात आलेल्या चार मोठय़ा टाक्यांमधून डोंगरमाथ्यावरील राजकीय मंडळींचे वास्तव्य असलेल्या ‘वैनगंगा’ इमारतीला पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

या टाक्यांना दिलेल्या नळजोडण्या अधिकृत आहेत की अनधिकृत, याचा शोध पालिकादरबारी सुरू झाला आहे, तर आसपासच्या चाळींना कमी पाणी मिळत असताना या इमारतीला इतक्या जलजोडण्या दिल्याच कशा असा प्रश्न या परिसरातील नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

वरळी येथील सर पोचखानवाला रोडवर एकेकाळी पोलिसांची वसाहत होती. साधारण १९८५-९०च्या दरम्यान या जागेवर वरळी सागर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी उभी राहिली. या सोसायटीमध्ये वैनगंगा, पूर्णा, गोदावरी, भीमा, कृष्णा, वैतरणा अशा इमारती उभ्या राहिल्या. त्या काळी राजकारण आणि अन्य क्षेत्रातील नामवंत मांडळींच्या वास्तव्यामुळे या इमारती प्रकाशझोतात आल्या.

वरळी परिसराला दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री १०.४५ या वेळेत पाणीपुरवठा केला जातो. गेल्या रविवारी संध्याकाळी डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गाला येऊन मिळणाऱ्या जयवंत पालकर मार्गावर मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा पाट वाहत असल्याची तक्रार पालिकेच्या जी-दक्षिण विभाग कार्यालयाकडे आली. तक्रार मिळताच पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रथमदर्शनी जलवाहिनीमधून पाण्याची गळती होत असावी असे त्यांना वाटले. दुसऱ्या दिवशी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा पाहणी केली असता डोंगरामध्ये खोदकाम करून १० हजार लिटरची एक अशा चार टाक्या बसविल्याचे निदर्शनास आले. या चारही टाक्यांचा परिसर भिंत बांधून बंदिस्त करण्यात आली आहे. शिडीच्या आधारे भिंतीवर चढून पालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता, याच टाक्यांमधून पाण्याची गळती होत असल्याचे उघडकीस आले. टाक्यांवर जलमापकेही बसविण्यात आली होती. टाक्यांना जोडलेल्या जलवाहिनीचा माग घेतल्यानंतर त्या वैनगंगापर्यंत पोहोचल्याचे लक्षात आले. डोंगर खोदून सपाटीकरण करून बसविलेल्या टाक्या पाहून पालिका अधिकारी-कर्मचारीही चक्रावले.

वरळी येथील डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गाला येऊन मिळणाऱ्या जयवंत पालकर मार्गावरून दोन पायवाटांनी वरळी सागर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जाता येत होते. टाक्यांजवळून जाणारी एक पायवाट भिंतींचा कोट उभा करून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बसविलेल्या टाक्या सहजासहजी दृष्टीस पडत नाहीत.

वैनगंगा इमारतीला सर पोचखानवाला रोडवरील जलवाहिनीमधून पाणीपुरवठा करण्यात येतो. असे असतानाही डॉ. अ‍ॅनी बेझंट मार्गावरील जलवाहिनीतून या टाक्यांमध्ये पाणीपुरवठा करण्यास परवानगी कुणी आणि कधी दिली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जी-दक्षिण विभाग कार्यालयाला देण्यात आले आहेत. तर पालिका अधिकाऱ्यांनीही याविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला.