बांधकामे, व्यवसायांमुळे हवेची प्रतवारी खालच्या स्तरावर

मुंबईत गेले दोन दिवस पावसाने जोर पकडल्याने ठिकठिकाणची हवा ‘धुऊन’ निघाली असली तरी वांद्रे-कुर्ला संकुलातील खालावलेली हवा काही सुधारण्याच्या मार्गावर नाही. समुद्रावरून येणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे उपनगरातील हवा शुद्ध होत असते. पावसामुळेही हवेतील प्रदूषण कमी होते. आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्राचे स्वप्न पाहणाऱ्या वांद्रे-कुर्ला संकुलात मात्र मोठय़ा प्रमाणावर चालणारी बांधकामे आणि प्रदूषण निर्माण करणारे लहानलहान व्यवसाय यामुळे या परिसरात कमालीचे प्रदूषण जाणवते आहे. पावसाळ्यापूर्वी हवेची प्रतवारी सुमारे ३०० एक्यूआय इतकी खालावली होती. पावसानंतर त्यात थोडीफार सुधारणा झाली. मात्र आता पुन्हा एकदा येथील हवेची प्रतवारी बिघडली आहे.

सध्या या भागात रिलायन्स कन्व्हेंशन सेंटर, इंडियन न्यूजपेपर सोसायटी आणि गोदरेज या मोठय़ा कंपन्यांचे जोरदार बांधकाम सुरू आहे. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणात धुळीचे आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हवेची प्रतवारी मोजणाऱ्या ‘सफर’ या प्रकल्पांतर्गत गेले अनेक दिवस येथील हवेतील प्रदूषणाची पातळी ३०० (एअर क्वॉलिटी इंडेक्स) पर्यंत खालावल्याची नोंद होते आहे.

येथील बांधकामामुळे हवेच्या दर्जावर परिणाम होत आहे. तसेच या परिसरात अनेक भंगार व्यावसायिक आहेत. येथील भंगारात निघालेले काही सामान जाळण्यात येते. त्यामुळे त्यातून निघणारा रासायनिक धूर हवेत मिसळूनही मोठय़ा प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. याशिवाय वाहतुकीची समस्या आहेच. याचा परिणाम येथील रहिवाशांवर व या भागात कामाकरिता येणाऱ्या नोकरदारांच्या आरोग्यावर होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईभर हवेचा दर्जा सध्या चांगला आहे. बीकेसीत मात्र हवा प्रदूषण गंभीररीत्या जाणवत आहे. बांधकामाच्या धुळीमुळे या भागाला हवेच्या प्रदूषणाला सामोरे जावे लागते आहे, असे ‘सफर’चे प्रकल्प संचालक डॉ. गुर्फाम बैग यांनी सांगितले.

हवेचा दर्जा गेल्या काही दिवसांतील वांद्रे-कुर्ला संकुलातील हवेचा दर्जा (एक्यूआयमध्ये)

१७ जून- ३२६

१६ जून- ३४२

१५ जून- २९०

१४ जून- २३९

२१ जून- २०८

२२ जून- २०४

(सफरच्या नोंदणीनुसार एक्यूआय ३०० ते ४००च्या आसपास असेल तर हवा अत्यंत वाईट समजली जाते. तर ४०० ते ५०० धोकादायक. मधल्या काळात पावसामुळे हवेची प्रतवारी सुधारली)