मुंबई आणि उपनगरात शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. मुंबईच्या अनेक भागांना पावसाने झोडपून काढले आहे. घाटकोपर मुलुंड, भांडुप, ठाणे, कल्याण, पालघर, जोगेश्वरी, मालाड, बोरीवली अशा अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच हवामान विभागाने मुंबईत हाय अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पश्चिम किनारपट्टी भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईसह किनारपट्टी भागात शनिवार आणि रविवारी काही भागात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याचे उप महासंचालक के.एस.होसाळीकर यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच किनारपट्टी भागावरही हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, जुलै महिन्यात मुंबई आणि उपनगर परिसरात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद करण्यात आली आहे. 2014 नंतर यावर्षी जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. यापूर्वी 1959 साली जुलै महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस झाला होता. यावर्षी जुलै महिन्यात कुलाब्यात सरासरी 1175.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर सांताक्रुझ परिसरात जुलै महिन्यात सरासरी 1464.8 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 2014 साली सरासरी 1468.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. 1959 नंतर राज्यात 2014 साली राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर यावर्षी जास्त पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, दरवर्षी जुलै महिन्यात सरासरी कोलाबा परिसरात सरासरी 686.6 मिलीमीटर आणि सांताक्रुझ परिसरात सरासरी 799 मिलीमीटर पावसाची नोंद केली जाते.