News Flash

पश्चिम रेल्वेवर हाय अलर्ट, दहशतवादी हल्ल्याची भीती

पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे

मुंबई, अहमदाबाद, रतलाम, राजकोटमध्ये पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट देण्यात आला असून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनंतर, पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात हा इशारा देण्यात आला आहे. आरपीएफ महानिरीक्षक कार्यालयाने पश्चिम स्थानकांवरील सर्व सुरक्षा यंत्रणांना लांब पल्ल्यांच्या गाड्यावर करडी नजर ठेवण्याचा आदेश दिला आहे. विशेष करुन जम्मूला जाणाऱ्या आणि येणाऱ्या ट्रेन्सवर नजर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

२२ फेब्रुवारीला चर्चगेटमधील महानिरीक्षक कार्यालयाने मुंबई, वडोदरा, अहमदाबाद, रतलाम, राजकोट आणि भावनगर येथील आरपीएफ प्रमुखांना पत्र पाठवलं आहे. पत्रात सांगण्यात आलं आहे की, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला होण्याची भीती आहे. गुजरातमधील गुप्तचर यंत्रणांनी सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणले जातील अशी माहिती दिली आहे. यामध्ये रेल्वे स्थानकं, मंदिर आणि स्टॅच्यू ऑफ युनिटीला टार्गेट केलं जाऊ शकतं.

गुप्तचर यंत्रणांनी हा हल्ला हैद्राबादमधील व्यक्ती करणार असल्याचंही सांगितलं आहे. हा दहशतवादी पुलवामा हल्ल्यातही सहभागी होता. कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी आरपीएफ जवानांनी राज्य पोलीस आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात राहण्यास सांगण्यात आलं आहे. सर्व सुरक्षा विभागांना संवेदनशील स्थानकांची यादी देण्यात आली आहे.

सुरक्षेच्या पार्श्वभुमीवर २७ फेब्रुवारीला पश्चिम रेल्वे आरपीएफ आणि मुंबई जीआरपी अधिकाऱ्यांची समन्वय बैठक पार पडली. अलर्ट जारी करण्यात आला असून जीआरपी आणि राज्य पोलिसांशी समन्वय साधत गरज लागेल त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाटकर यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2019 8:54 am

Web Title: high alert on western railway
Next Stories
1 अभिनंदन मायदेशी परतण्यामागे नरेंद्र मोदींचा पराक्रम – स्मृती इराणी
2 पाकिस्तानने जबरदस्ती व्हिडीओ रेकॉर्ड करायला लावल्याने अभिनंदन यांना झाला उशीर
3 विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेनंतर आनंद महिंद्रा म्हणतात…
Just Now!
X