19 February 2020

News Flash

उच्च रक्तदाब नियंत्रणाकडे सर्वसामान्यांचे दुर्लक्षच

जीवनशैलीशी निगडित आजार म्हणून ओळखला जाणाऱ्या उच्च रक्तदाबाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे

(संग्रहित छायाचित्र)

उच्च रक्तदाब दिन विशेष

केईएम रुग्णालयाच्या संशोधनात्मक अभ्यासातील निष्कर्ष

धकाधकीच्या जीवनशैलीमुळे एकीकडे उच्च रक्तदाबाची समस्या वाढत असताना त्यावर नियंत्रण आणणाऱ्या उपचारांकडे मात्र, सर्वसामान्यांचे दुर्लक्ष होत आहे. मुंबईतील केवळ ३१ टक्के रुग्णच याबाबतीत सजग असल्याचे केईएम रुग्णालयाने केलेल्या संशोधनात्मक अभ्यासातून उघड झाले आहे. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रणाबाबत जनजागृती करण्याची गरज या अभ्यासातून व्यक्त करण्यात आली आहे.

जीवनशैलीशी निगडित आजार म्हणून ओळखला जाणाऱ्या उच्च रक्तदाबाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा या आजाराबाबाबत लोकांमध्ये योग्य माहिती आहे का, नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य उपचार घेतले जातात का याची पडताळणी करण्यासाठी केईएम रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाने नायगावच्या ४० बीडीडी चाळींमध्ये सर्वेक्षण केले होते. ३५ वर्षांवरील ६६७ जणांची यामध्ये तपासणी केली गेली असून यात ७६ टक्के महिला आणि २४ टक्के पुरुषांचा समावेश होता. हे संशोधन ‘जर्नल ऑफ फॅमिली मेडिसीन प्रायमरी केअर’ या नियतकालिकामध्ये मार्च २०१९ ला प्रसिद्ध झाले आहे.

चाळीतील ५० टक्के लोकांमध्ये उच्च रक्तदाबाची पूर्व लक्षणे आढळून आली, तर ३७ टक्के लोकांना उच्च रक्तदाब असल्याचे दिसून आले. रक्तदाबाचा उपचार घेणाऱ्यांमध्ये फक्त ३१ टक्के लोक जागरूकतेने उपचारावर भर देत असल्याचे या अभ्यासातून निदर्शनास आले. यातील २५ टक्के रुग्णांना तपासणीमध्ये प्रथमच उच्च रक्तदाब असल्याचे निदान झाले आहे. महिला आणि पुरुषांमध्ये या आजाराच्या प्रमाणाबाबत विशेष फरक नसल्याचेही यात नमूद केले आहे.

उच्च रक्तदाबाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक असून हृदयविकाराशी संबंधित आजार जडण्याची शक्यता असते. जनजागृती आणि उपचाराबाबत योग्य माहिती लोकांमध्ये पोहचणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पातळीवर यासाठी सुरू केलेल्या कार्यक्रमामुळे आवश्यक तेवढा बदल झालेला नाही. त्यामुळे अजूनही या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य झालेले नाही, असेही या अभ्यासात मांडले आहे.

काय काळजी घ्याल?

* वयाची पस्तिशी ओलांडल्यानंतर दरमहा रक्तदाबाची तपासणी करणे आवश्यक.

* उच्च रक्तदाबाचे निदान झालेल्या रुग्णांनी नियमित उपचार घेणे आवश्यक.

* उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी आहाराच्या वेळांचे नियमन, मीठाचे प्रमाण कमी करायला हवे.

* दिवसभरात किमान अर्धा तास चालणे किंवा व्यायाम करणे गरजेचे

उच्च रक्त दाबाची लक्षणे

सतत डोके दुखणे, छातीत जडपणा येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक घाम येणे

‘जीवनशैलीत बदल करणे आवश्यक’

उच्च रक्तदाब हा आजार केवळ औषधाने नियंत्रित राहत नसून यासाठी जीवनशैलीशी निगडित आहार, व्यायाम इत्यादी बदलही आवश्यक आहेत. अनेकदा रुग्ण वर्षांनुवर्षे औषधे घेत राहतात, परंतु त्यांना फारसा फरक पडत नाही. याचे हे एक कारण आहे. काही रुग्ण सुरुवातील औषध घेतात, परंतु काही काळाने कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधे बंददेखील करतात. मुंबईसारख्या शहरात वैद्यकीय सुविधा असूनही लोक जाणूनबुजून उपचारामध्ये सातत्य राखत नाहीत किंवा जागरूकतेने उपचारांकडे लक्ष देत नाहीत, असे या अभ्यासाच्या प्रमुख संशोधक आणि केईएम रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन विभागातील प्राध्यापक डॉ. ऋजुता हाडये यांनी सांगितले.

First Published on May 17, 2019 12:53 am

Web Title: high blood pressure control ignores general public
Next Stories
1 पालिकेच्या चार प्रभागांच्या पोटनिवडणुकींना स्थगिती
2 रसायनांचा मारा करून झाडांचा बळी?
3 रेल्वे पुलांवरील गर्दीचा पेच!
Just Now!
X