इंडिया हार्टच्या अभ्यासातून निदर्शनास; हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार वाढत असल्याची नोंद

मुंबई : डॉक्टरांकडून उच्च रक्तदाबाचे निदान, नियंत्रण आणि उपचार यांकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार वाढत असल्याचे इंडिया हार्टच्या अभ्यासातून नोंदले आहे. देशभरातील जवळपास १८ हजार उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे सर्वेक्षण यामध्ये केले असून राज्यातील २ हजार रुग्णांचा यात समावेश आहे.

रक्तदाब मोजण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे व्हाईट कोट आणि मास्क उच्च रक्तदाब दोन प्रकारचे रुग्ण आढळले आहेत. एखाद्या कारणास्तव व्यक्तीचा सिस्टोलिक रक्तदाब हा १४०च्या वर किंवा डायास्टोलिक रक्तदाब हा ९० पेक्षा जास्त असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीमध्ये दिसून आल्यास तातडीने उच्च रक्तदाबाची औषधे डॉक्टरांकडून सुरू केली जातात. या प्रकारच्या रक्तदाबाला व्हाईट कोट हायपरटेन्शन म्हटले जाते. वास्तवात अशाप्रकारे एकदा उच्च रक्तदाब आढळल्यास पुढील आठ दिवस सलग सकाळी आणि संध्याकाळी रक्तदाब तपासला जातो. यामध्येही उच्च रक्तदाबाची लक्षणे आढळल्यास औषधे सुरू केली जातात.

दुसऱ्या प्रकारात कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्याने रुग्ण डॉक्टरांकडे गेल्यानंतर रक्तदाबाची तपासणी केली जाते आणि यामध्ये प्रमाण योग्य असल्याचे दिसते. खरे तर रुग्णामध्ये उच्च रक्तदाबाची लक्षणे आढळल्यास किंवा उच्च रक्तदाबासाठीच्या धोकादायक गटात व्यक्तीचा समावेश असल्यास आठ दिवस सलग रक्तदाबाच्या नोंदी ठेवणे गरजेचे असते. परंतु डॉक्टरांकडून ही काळजी न घेतल्याने उच्च रक्तदाबाचे निदान वेळेत होत नाही आणि उच्च रक्तदाबाच्या त्रासाकडे दुर्लक्ष केले जाते. अशा प्रकारच्या रक्तदाबाला मास्क हायपरटेन्शन असे म्हणतात.

डॉक्टरांनी योग्यरीतीने निदान न केल्याने गेल्या काही वर्षांत उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना उपचार वेळेत मिळू शकलेले नाहीत, असे या अभ्यासातून निदर्शनास आले आहे. राज्यात दोन हजार रुग्णांमध्ये २१ टक्के रुग्णांना उच्च रक्तदाब असूनही त्याचे निदान न झाल्याचे दिसून आले आहे. तर १९ टक्के रुग्णांना उच्च रक्तदाबाचा त्रास नसूनही मात्र औषधोपचार सुरू केले होते. त्यामुळे सुमारे ४० टक्के रुग्णांना रक्तदाबाच्या आजाराबाबत योग्य उपचार मिळत नसल्याचे या अभ्यासातून सिद्ध होते. हा अभ्यास १५ राज्यांमध्ये एप्रिल २०१८ ते जून २०१९ या काळात केला आहे.