डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी आरोपी असलेल्या तीन महिला डॉक्टरांना दिवाळीसाठी मुंबईबाहेर जाण्याची परवानगी उच्च न्यायालयाने दिली आहे. मात्र, प्रवासाबाबतची सर्व माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. डॉ. पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप तिन्ही महिला डॉक्टरांवर आहे.

डॉ. पायल तडवी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असेलल्या या तिन्ही आरोपी डॉक्टर तडवीच्या वरिष्ठ सहकारी होत्या. त्यांच्या छळाला कंटाळून तडवीने २२ मे रोजी नायर रुग्णालयाच्या हॉस्टेलमध्ये तिच्या रूमवर गळफास लावून आत्महत्या केली. या तिघींनीही तडवीवर जातिवाचक टिप्पणी करून तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप झाल्यानंतर पोलिसांनी तिघींनाही अटक केली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात उच्च न्यायालयाने आरोपी डॉ. हेमा आहुजा, भक्ती मेहरे व अंकिता खंडेलवाल या तिघींची सशर्त जामिनावर सुटका केली होती. यात जामीनावर सुटका करण्यात आली असली तरी खटला सुरू असेपर्यंत तसेच या खटल्याचा निकाल लागेपर्यंत उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय शहराबाहेर जाता येणार नाही अशी अट न्यायालयाने घातली होती. त्यानंतर तिन्ही आरोपींना आपल्या शैलेश खरात या वकिलामार्फत गावी जाण्याकरिता परवानगी मागणारा अर्ज न्यायालयात केला होता. त्याला परवानगी देण्यात आली आहे. न्यायालयाच्या परवानगीनंतर, तिन्ही आरोपींपैकी दोघी महाराष्ट्रातच असणार आहेत, तर एक आरोपी दिवाळीसाठी मध्य प्रदेशला जाणार आहे, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे. या तिघींनीही आपण निर्दोष असल्याचे न्यायालयाला सांगितले. तसेच या संदर्भातील खटला सुरू झाल्यास आपण त्यासाठी हजर राहू. पळून जाण्याचा हेतू नाही. केवळ काही वेळ आपल्या कुटुंबीयांसोबत घालवायचा आहे, असे तिघींनी न्यायालयात सादर केलेल्या अर्जात नमूद केले आहे.

काय आहे प्रकरण –
पायल मे २०१८ मध्ये टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाली. डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्याकडून होणाऱ्या त्रासाविषयी, तिला दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त कामाविषयी, ‘भगौडी’ म्हणून चिडवत असल्याबद्दल, रुग्णांसमोर अपमान करत असल्याबद्दल तिने तिची आई आबिदा हिला अनेकदा सांगितलं होतं. या संदर्भात तक्रार करणारं एक पत्रही तिच्या आईने १३ मे रोजी अधिष्ठाता भारमल यांना लिहिलं होतं. ते देण्यासाठी त्या आणि त्यांची पुतणी आशा तडवी भारमल यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. शिपायाने त्यांना अडवलं आणि पत्र टपालात देण्यास सांगितलं. आबिदा टपाल कार्यालयात गेल्या आणि तिथल्या लिपिकाला ते पत्र दिलं. पत्राच्या प्रतीवर शिक्का मारून ती प्रत आबिदा यांना परत केली. मात्र पायल आणि तिचे पती सलमान तिथे आले आणि त्यांनी हे पत्र दिलं तर पायलला होणारा त्रास वाढेल, असं सांगत ते मागे घ्यायला लावलं. त्यामुळे त्यांनी ते पत्र मागे घेतलं, असं आबिदा यांनी जबानीत म्हटलं आहे. त्या पत्राची रुग्णालयाचा शिक्का मारलेली प्रतही उपलब्ध आहे.

त्यानंतर त्यांनी पायलच्या वसतिगृहातील वॉर्डन मनीषा रत्नपारखी यांना भेटून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली आणि या तीन डॉक्टरांना समज देण्याची विनंती केली. त्याच दिवशी डॉ. सलमान आणि आशा तडवी यांनी पायलच्या व्याख्यात्या डॉ. चिंग लिंग यांची भेट घेतली आणि पायलला होत असलेल्या त्रासाबद्दल सांगितलं. मात्र चिंग लिंग यांनीही त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर चिंग लिंग यांनी त्या चौघींनाही बोलावून घेतलं आणि त्या तिघींना जाब विचारण्याऐवजी पायललाच समज दिली, असं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

२२ मे रोजी दुपारी ३.४९ च्या सुमारास पायलने तिच्या आईला फोन केला आणि होणारा त्रास कायम असल्याचं सांगितलं. ती जेवणासाठी रुग्णालयाबाहेर गेली असता, ‘बाहेर का गेलीस? जेवताना जे दात दाखवून फोटो काढलास ते ३२ दात पाडून टाकेन,’ अशी धमकी दिली, असंही पायलने आबिदा यांना सांगितलं. त्या दिवशी पायलला दोन शस्त्रक्रिया एकटीनेच करण्यास भाग पाडण्यात आलं आणि या तीन डॉक्टर केवळ बसून होत्या. शस्त्रक्रिया कक्षात या तीन डॉक्टरांचं पायलवर मोठय़ाने ओरडणं ऐकल्याचं आणि त्यानंतर पायल रडत आपल्या खोलीवर निघून गेल्याचं काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पायल व्हेंटिलेटरवर असल्याचं कुटुंबीयांना कळवण्यात आलं आणि थोडय़ाच वेळात तिचा मृत्यू झाला.