नवी मुंबईच्या मंडळावर कारवाई; सर्वच उत्सव मंडपांवर न्यायालयाची नजर
न्यायालयाचे आदेश सर्रास धाब्यावर बसवून ठाणे-बेलापूर मार्गावर मंडप उभारल्याबद्दल नवी मुंबईतील नवयुवक मित्रमंडळाला एक लाख रुपयांचा ‘दंड’ ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाच्या अवमान कारवाईपासून बचाव करण्यासाठी दुष्काळग्रस्तांच्या मुख्यमंत्री मदतनिधीत एक लाख रुपये जमा करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंडळाला दिले आहेत. नियम मोडून उत्सव दणक्यातच साजरा करू पाहणाऱ्या मंडळावर प्रथमच कारवाई होत आहे.
या मंडपावरून नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनीही योग्य कारवाई न केल्याबद्दल न्यायालयाने त्यांना फटकारले. परवानगीशिवाय आणि कायदा हातात घेऊन मंडप उभाराल तर दया नाही, हा थेट संदेश सर्व संबंधितांना जाण्याची गरज आहे आणि त्याची सुरुवात केली जात आहे, असा इशारा न्यायालयाने दिला आहे. सागर कोळेकर यांनी ही याचिका केली होती.
दहीहंडी उत्सवादरम्यानही कायद्याची आणि न्यायालयाच्या आदेशांची सर्रास पायमल्ली होताना दिसत असतानाही कुठल्याही यंत्रणेने एकाही मंडळ, आयोजक वा पक्षावर कारवाई केलेली नाही, ही बाब रस्ते व पदपथांच्या अडवणूक करणाऱ्या मंडपांवर कारवाईची मागणी करणारे मूळ याचिकाकर्ते महेश बेडेकर यांच्यावतीने मंगळवारच्या सुनावणीत न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यातच बेकायदा मंडपांच्या पाहणीसाठी नेमलेली पथके कार्यरत नसल्याची बाबही पुढे आल्यानंतर न्यायालयाने एकूण प्रकाराबाबत संताप व्यक्त केला. तसेच या सगळ्याची गंभीर दखल घेत पालिका अधिकारी, महसूल अधिकारी, मंडप उभारणारी मंडळे व ट्रस्ट आणि राजकीय पक्षांवर अवमान कारवाई करण्याचा इशाराही दिला.