सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी सीबीआयच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

गुजरात येथील सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी सुरू असलेल्या खटल्यात आणखी दोन साक्षीदार ‘फितूर’ झाल्याची गंभीर दखल घेताना या सगळ्याबाबत मूग गिळून गप्प असलेल्या सीबीआयच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एवढेच नव्हे, तर सुनावणीदरम्यान सीबीआयकडून आपल्याला ज्या प्रकारचे सहकार्य अपेक्षित आहे ते मिळत नसल्याबाबत न्यायालयाने या वेळी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच सीबीआयची हीच भूमिका असेल तर खटला चालवलाच का जात आहे, असा संतप्त सवालही न्यायालयाने केला.

या प्रकरणी तीन आयपीएस अधिकाऱ्यांना दोषमुक्त केल्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सोहराबुद्दीनचा भाऊ रूबाबुद्दीन याने केलेल्या याचिकेवर सध्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात सध्या सोहराबुद्दीन बनावट चकमक खटला सुरू असून आणखी दोन साक्षीदार ‘फितूर’ झाले. याची न्यायमूर्ती मोहिते-डेरे यांनी सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी गंभीर दखल घेतली. साक्षीदार ‘फितूर’ होत असताना सीबीआय मूग गिळून गप्प का, साक्षीदारांच्या संरक्षणाची, त्यांनी नीडरपणे न्यायालयात साक्ष देण्याची जबाबदारी सीबीआयची नाही का, साक्षीदारांच्या संरक्षणासाठी उपाययोजना तरी केल्या जात आहेत का, अशी प्रश्नांची सरबत्ती सीबीआयकडे केली.

साक्षबदल..

अमीन यांचा या बनावट चकमकीत सहभाग होता आणि घटनेच्या वेळी ते हजर होते हे सांगणाऱ्या साक्षीदाराने अनेकवेळा साक्ष बदलेली आहे, ही बाब अमीन यांच्यावतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. शिवाय नुकतीच त्याची साक्ष नोंदवण्यात आली तेव्हाही त्याने साक्ष फिरवल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्याचीही न्यायालयाने गंभीर दखल घेतली. तसेच प्रतिज्ञापत्रावर वारंवार खोटी साक्ष दिल्याप्रकरणी या साक्षीदारावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी काय केले, असा सवाल न्यायालयाने सीबीआयकडे केला.