उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

मुंबई : ठाणे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सोमवारपर्यंत अटक न करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत या प्रकरणी सुनावणी सुरू होती.

पोलीस निरीक्षक संभाजी घाडगे यांच्या तक्रारीनंतर ठाणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या आणि प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याच्या मागणीसाठी परमबीर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच अटकेपासून दिलासा मागितला आहे. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा सूड म्हणून आपल्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा परमबीर यांच्या वतीने अ‍ॅड्. महेश जेठमलानी यांनी केला. तर परमबीर यांनी दखलपात्र गुन्हा केल्याचे सकृद्दर्शनी उघड झाल्यावर त्यांच्या विरोधात प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आल्याचा दावा राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. दरायस खंबाटा यांनी केला. .

..म्हणून रात्री उशिरापर्यंत सुनावणी

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यावर परमबीर यांच्यावर आताच गुन्हा दाखल करण्याबाबत न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला. एवढेच नव्हे, तर परमबीर यांचा सरकारसोबत वाद सुरू झाल्यावरच हे सगळे का केले जात आहे, अशी विचारणा केली. तसेच आणखी काही दिवस परमबीर यांच्यावर अटकेची कारवाई करणार नाही, ही हमी कायम ठेवण्यास सरकारने नकार दिल्याने या प्रकरणावर रात्री १२ वाजेपर्यंत सुनावणी घ्यावी लागल्याचेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. त्याचप्रमाणे प्रकरणाची सुनावणी सोमवारी ठेवत तोपर्यंत परमबीर यांना अटक न करण्याचे आदेश सरकारला दिले.