मुंबई : मटण दरवाढीविरोधात मटणविक्रेत्यांवर दबाव टाकून दुकान बंद करण्याची नोटीस बजावणाऱ्या कोल्हापुरातील गारगोटी आणि कडगाव ग्रामपंचायतींसह कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. तसेच अशाप्रकारे नोटीस बजावण्याचे कोणतेही अधिकार नसताना केलेल्या कारवाईचा खुलासा करावा, असेही न्यायालयाने बजावले आहे.

मटणाचा तांबडा पांढरा रस्सा   कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे कोल्हापूरात मटणाचे दर ५६० ते ५८० रुपये प्रति किलो झातयानंतर आरडाओरडा झाला.    हे दर कमी करण्यासाठी काही ग्रामस्थांनी गारगोटी आणि कडगाव ग्रामपंचायतींना विनंती केली होती. ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करत मटणाचे दर ३६० ते ३८० रुपये करावे अन्यथा दुकान बंद करावे अशा आशयाची नोटीस मटण विक्रेत्यांना बजावली. त्याविरोधात मटण विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.