शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सांगण्यावरुन काही पुरुषांकडून मारहाण व छळ केल्याचा ३६ वर्षांच्या महिलेच्या आरोपांबाबत चौकशी करण्याचा आदेश मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना दिले आहेत. याबाबत २४ जून पर्यंत न्यायालयात अहवाल सादर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे.

पेशाने मानसशास्त्रज्ञ असणाऱ्या महिलेने राज्यसभा सदस्य संजय राऊत यांच्या सांगण्यावरून अज्ञात लोकांनी आपल्यावर दगडफेक केली व त्रास दिला आहे, असा दावा या करत फेब्रुवारीमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी घेण्यात आली. एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे जमादार यांच्या खंडपीठाने पोलीस आयुक्तांना चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

याचिकाकर्त्या महिलेला बनावट पीएचडी पदवीप्रकरणी अटक

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, याचिका दाखल झाल्यानंतर अलीकडेच एका महिलेला अज्ञात प्रकरणात अटक करण्यात आली होती, जिथे तिने बनावट पीएचडी पदवी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे असे याचिकार्त्या महिलेच्या वकिल आभा सिंह यांनी हायकोर्टाला सांगितले “याचिकाकर्ती दहा दिवस तुरूंगात आहेत. तिने हायकोर्टात याचिका दाखल केल्यानंतर आता संपूर्ण पोलीस यंत्रणेने दबाव टाकला होता. हे संपूर्णपणे गैरवर्तन आहे,” असे सिंह यांनी सांगितले. यावर अटकेला आव्हान देण्यासाठी याचिकाकर्ता स्वतंत्र याचिका दाखल करू शकतो, असे कोर्टाने म्हटले आहे.

२४ जून रोजी अहवाल सादर करण्याचे पोलीस आयुक्तांना आदेश

“आम्ही पोलीस आयुक्तांना याचिकेत उपस्थित केलेल्या तक्रारींकडे लक्ष देऊन योग्य तो तपास करण्याचे निर्देश देतो. पोलीस आयुक्त आम्हाला २४ जून रोजी अहवाल सादर करतील,”असे खंडपीठाने म्हटले आहे. २०१३ आणि २०१८ मध्ये या महिलेने तीन तक्रारी केल्या आहेत, परंतु अद्यापपर्यंत दोषींवर कारवाई झालेली नाही, असे या याचिकाकर्तीच्या वकिलांनी म्हटले आहे. त्यातील पहिल्या गुन्ह्यात आरोपपत्र दाखल झाले आहे, दुसऱ्या प्रकरणात पोलिसांनी पुरावे नसल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला होता. मात्र यातील एकाही गुन्ह्यात राऊत यांच्या नावाचा समावेश नव्हता.

शिवसेना खासदार संजय राऊत आपली विविध प्रकारे छळवणूक करीत असल्याचा आणि पोलिसांत तक्रार करूनही काहीच कारवाई केली जात नसल्याचा आरोप करणारी याचिका महिलेने उच्च न्यायालयात केली होती. मात्र राऊत यांनी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या वेळी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले होते.

महिलेच्या छळाचे आरोप संजय राऊत यांना अमान्य

‘ही महिला आपल्याला मुलीसारखी आहे. तिच्या कुटुंबाशी आपल्या कुटुंबाचे स्नेहाचे संबंध आहेत. पतीसोबत तिचा वाद सुरू आहे. या प्रकरणात आपण तिच्या पतीची बाजू घेत असल्याच्या समजातून ती आपल्यावर हे आरोप करत आहे,’ असा दावा राऊत यांच्यावतीने अ‍ॅड्. प्रसाद ढाकेफाळकर यांनी केला होता. तर, मुलगी असणे आणि मुलीसारखे असणे यात फरक आहे, असे सांगत या महिलेने राऊत यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.