माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या २००९ सालच्या प्राप्तिकर परतव्याचा तपशील माहितीच्या अधिकाराखाली (आरटीआय) उपलब्ध करण्यास नकार दिल्याच्या निर्णयाविरोधात माजी मुख्य माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.
पवार यांच्या २००९ सालच्या प्राप्तिकर परताव्याचा तपशील गांधी यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत मागितला होता. परंतु गांधी यांचा या तपशीलाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट करत प्राप्तिकर विभागातर्फे त्यांची मागणी फेटाळून लावली. गांधी यांनी या निर्णयाला प्रथम अपिलीय अधिकाऱ्याकडे आव्हान दिले होते. मात्र प्राप्तिकर विभागाच्या जन माहिती अधिकाऱ्याचा निर्णय योग्य ठरवत अपिलीय अधिकाऱ्याने गांधी यांचे अपील फेटाळून लावले. त्यामुळे गांधी यांनी माहिती आयोगाच्या पाच सदस्यीय खंडपीठाकडे दुसरे अपील दाखल केले होती.