भारत जगातील एकमेव देश; शोध आणि सुटका मोहीम क्षमतेत वाढ

खोल समुद्रात पाणबुडीत अडकलेल्या नौसैनिकांची सुटका करणारे जगातील अत्याधुनिक ‘पाणबुडी बचाव वाहन’ (डीएसआरव्ही) बुधवारी नौदलाच्या ताफ्यात प्रथमच दाखल झाले. अशी अद्ययावत यंत्रणा असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे.

नेव्हल डॉकयार्ड येथे या यंत्रणेचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. नौदलाकडे जर्मन तंत्रज्ञानाची ‘एस.डब्ल्यू.डी’, रशियाची किलो क्लास वर्गातील ‘सिंधघोष’, भारतीय बनावटीची ‘आयएनएस अरिहंत’, ‘आयएनएस अणु’ आणि रशियन तंत्रज्ञानाची ‘आयएनएस चक्र’ या पाणबुडय़ा आहेत. तसेच फ्रान्सची कलवरी वर्गातील पाणबुडीची चाचणी सुरू आहे. नौदलाकडे पाणबुडय़ा असल्या तरी त्यांच्यासाठी आवश्यक असलेली बचाव यंत्रणा नव्हती. आयएनएस ‘सिंधू रक्षक’ या पाणबुडीला १४ ऑगस्ट २०१३ला अपघात होऊन १८ नौसैनिकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून अशा बचाव यंत्रणेची गरज अधोरेखित झाली होती. नौदलाने २०१६ मध्ये इंग्लडच्या जेम्ल फिशर अ‍ॅण्ड  सन्स कंपनीकडून या बचाव यंत्रणेसाठी करार केला होता.

ही अत्याधुनिक ‘डिप सबमरीन रेस्क्यू व्हेइकल’ (डीएसआरव्ही) म्हणजे ‘पाणबुडी बचाव वाहन’ बुधवारी नौदलात दाखल झाली. अशा दोन बचाव यंत्रणा भारताने घेतल्या आहेत. त्यांची किंमत दोन हजार कोटी रुपये आहे. कंपनी २५ वर्षांपर्यंत या यंत्रणेची देखभाल करणार आहे.

कंपनी नौसैनिकांना प्रशिक्षणही देणार आहे, अशी माहिती कमांडिंग ऑफिसर अरुण जॉर्ज यांनी दिली. पश्चिम नौदल प्रमुख गिरीश लुथरा यांनी सांगितले की, भारतात प्रथमच अशी वाहन यंत्रणा दाखल झाली आहे.

पाणबुडी बचाव वाहनाची वैशिष्टय़े

* समुद्रात ६५० मीटर खोल जाण्याची क्षमता

* एकाच वेळी १४ जणांची सुटका करणे शक्य

* आपत्कालीन काळात याचा वापर होईल.

*  दुर्घटनास्थळी पोहोचण्यासाठी या वाहनाला ७२ तास लागतात

* सलग १२ ते १८ तास काम करण्याची क्षमता

पूर्व किनाऱ्यावर विशाखापट्टणमला एप्रिलमध्ये दुसरे बचाव वाहन दाखल होणार आहे. या बचाव यंत्रणेमुळे नौदलाच्या शोध आणि सुटका मोहिमेच्या क्षमतेत वाढ होणार आहे.

– सुनील लांबा, नौदल प्रमुख