काँग्रेसचे मुखपत्र असलेल्या ‘नॅशनल हेरॉल्ड’ आणि ‘कौमी एकता’ या वृत्तपत्रांसाठी वांद्रे येथे दिल्या गेलेल्या आरक्षित जमिनीपैकी काही जागेवर उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्यांची ‘साईप्रसाद’ सोसायटी उभी राहिली आहे. मूळ जागेचा कोणताही वापर केला नसताना सुमारे पावणेचार कोटी रुपयांची व्याज माफी देण्यात आल्याचेही माहिती अधिकारात उघड झाले आहे.
ही जागा १९६४ पासून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी होती व ती अ.र. अंतुले मुख्यमंत्री असताना ३० वर्षांच्या लीजवर या वृत्तपत्रांना देण्यात आली. त्यावर वृत्तपत्र कार्यालय, ग्रंथालय, संशोधन केंद्र आदी काहीही न उभारता लीज पुन्हा वाढविले गेले. सुमारे २५० कोटी रुपये बाजारभाव असलेली ही जमीन परत घेण्यासाठी शासनाने काहीही पावले न टाकता अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना व्याजमाफीही देण्यात आल्याचे माहिती अधिकारात अनिल गलगली यांना दिसून आले आहे. यापैकी काही जमिनीवर साईप्रसाद सोसायटी उभी राहिली असून माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांच्यासह काही काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी तिचे सदस्य आहेत.
गलगली यांनी पाठपुरावा केल्यावर उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी तीन लाख ३० हजार रुपयांचा दंड आकारून या जमिनीचा वापर २२ डिसेंबर २०१४ पर्यंत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र माफ केलेले व्याज वसूल करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दोनदा पत्रे पाठवूनही पावले टाकली गेली नसल्याचे गलगली यांनी म्हटले आहे.