डॉप्लर रडार कार्यान्वित नसल्याची कबुली देणाऱ्या भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आता ते कार्यान्वित असल्याचा दावा बुधवारी उच्च न्यायालयात केला. त्याच वेळी मुंबईत चार ते पाच डॉप्लर रडार बसविण्याचा आपला मानस आहे. मात्र गगनचुंबी इमारती त्यासाठीची योग्य ती जागा शोधण्यात अडथळा बनत असल्याचा दावाही आयएमडीने या वेळी केला.
त्यावर डॉप्लर रडारसाठी गिल्बर्ट हिल, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील टेकडय़ा, आरे कॉलनी, शीव किल्ला किंवा अ‍ॅन्टॉप हिलसारख्या जागांचा विचार करण्याची सूचना न्यायालयाने आयएमडीला केली आहे. एवढेच नव्हे, तर या नगरविकास खाते, महसूल व वन खाते आणि पालिकेने एका आठवडय़ात एका अधिकाऱ्याची नियुक्ती करावी व या तिन्ही अधिकाऱ्यांनी जागा शोधण्यासाठी आयएमडीला सहकार्य करण्याचे आदेशच न्यायालयाने दिले आहेत.
२६ जुलैच्या घटनेतून पालिका, हवामान खाते आणि राज्य सरकारने परिस्थिती बदलण्यासाठी काहीच पावले उचललेली नाहीत हे उघडकीस आल्यावर परिस्थिती सुधारण्यासाठी डॉ. माधवराव चितळे समितीने केलेल्या शिफारशींची कितपत अंमलबजावणी केली याचे स्पष्टीकरण देण्याचे आदेश न्यायालयाने या यंत्रणांना दिले होते.
मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणी सुनावणी झाली. गगनचुंबी इमारती रडारसाठी आवश्यक ती जागा उपलब्ध होण्यात अडथळा ठरत आहेत, असे आयएमडीतर्फे सांगण्यात आले. त्यावर मग गगनचुंबी इमारतींवरच ते बसविण्यात का येत नाही, असा सवाल न्यायालयाने केला.

हवामानाचा अंदाज सहा तासांनी  
हवामानाचा अंदाज दर १२ तासांऐवजी दर चार तासांनी वर्तविण्याबाबत तसेच मुंबईत विविध ठिकाणी उपकेंद्रे उभारण्याबाबत विचार करा, अशी सूचना न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी आयएमडीला केली होती. त्याबाबत सांगताना आयएमडीने हवामानाचा अंदाज चार तासांऐवजी सहा तासांनी वर्तविणे शक्य होणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच मुंबई आणि परिसरात एकूण ३० अत्याधुनिक हवामान केंद्र कार्यान्वित केली जाणार असून डॉप्लर रडारही बसविण्यात येणार आहेत.