04 March 2021

News Flash

नगरपालिका क्षेत्रातही आता गगनचुंबी इमारती

महापालिकांप्रमाणे आता नगरपालिका आणि नगरपंचायती क्षेत्रातही गगनचुंबी इमारती उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

| November 29, 2013 03:37 am

महापालिकांप्रमाणे आता नगरपालिका आणि नगरपंचायती क्षेत्रातही गगनचुंबी इमारती उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील अ, ब, आणि क वर्ग नगरपरिषदा, नगरपंचायती, बिगर नगरपरिषद क्षेत्रासाठी आता एकच विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमामुळे नगरपालिकांमधील बांधकामावरील र्निबध उठले असले, तरी वाढत्या नागरीकरणासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देताना नगरपालिकांचे मात्र कंबरडे मोडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 वाढते नागरीकरण, चटईक्षेत्र निर्देशांक, विकास हस्तांतरण हक्क तसेच नागरीकरणासाठी आवश्यक मैदान, शैक्षणिक, आरोग्य विषयक सुविधांबरोबरच मोठय़ाप्रमाणात घरे उपलब्ध करण्यासाठी  ही सुधारित विकास नियंत्रण नियमावली लागू करण्यात आली असून याच आठवडय़ात ती राज्यभरात लागू होईल, अशी माहिती नगरविकास विभागातील सूत्रांनी दिली. नगरपालिकामध्ये बांधकामांवर आजवर असलेले र्निबध उठविण्यात आल्याने बांधकामाचा चटईक्षेत्र निर्देशाक त्या जागेच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या रुंदीवर अवलंबून असणार आह़े मूळ चटईक्षेत्र निर्देशांकाशिवाय वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक हा पैशांच्या मोबदल्यात दिला जाईल. तसेच विकास हस्तांतरण हक्क आता त्या नगरपालिका क्षेत्रात कुठेही वापरण्याची मुभा देण्यात आली असून हा टीडीआर रेडी रेकनरच्या दराशी निगडीत असेल. उंच इमारतींसाठी अग्निशमन यंत्रणेचे मापदंड निश्चित आणि बंधनकारक करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, पार्किंग, खेळाचे मैदान, उद्यान अशा आरक्षणाचीही तरतूद करण्यात आली आहे.
कोकणातील काही नगरपालिका आणि नगरपंचायतींना मात्र या विकास नियंत्रण नियमावलीतून वगळण्यात आले आहे. या भागात पर्यावरण विभागाचे अनेक कठोर नियम असल्याने तेथे वेगळे निकष लावण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. शासनाच्या या निर्णयामुळे मुबलक घरे निर्माण होणार असली तरी त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मात्र नगरपालिकांचे कंबरडे मोडणार आहे. मुळातच नगरपालिकांना शासनाच्याच अनुदानावर अवलंबून राहावे लागते, अनेकदा तेही पुरेशे आणि वेळेत मिळत  नाही, अशावेळी या नियमावलीत नगरपालिकांच्या उत्पन्नाबाबत काही ठोस तरतूदी केलेल्या दिसत नाहीत, मात्र ही अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच त्याबद्दल अधिक बोलता येईल, असे नगरपालिकांमधील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2013 3:37 am

Web Title: high rise buildings now in also in nagar palika zone
Next Stories
1 तळ कोकणात जलसंवर्धन
2 ऊस आंदोलनाचा फटका काँग्रेस- राष्ट्रवादीला
3 ‘बालभारती’च्या कागद खरेदीत ४० कोटींचा तोटा
Just Now!
X