संदीप आचार्य

शरीरात रोगप्रतिकारशक्ती अधिक असल्यास कोणत्याही उपायांविना करोनामुक्त होऊ शकतो, अशा बातम्या समाजमाध्यमांमधून पसरू लागल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधांच्या विक्रीत उच्चांकी वाढ झाली आहे. त्यामुळे करोनाच्या संकटातही औषध विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत.

मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरी भागांतील औषध दुकानांबाहेर प्रतिकारशक्ती वाढविणारी औषधे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. व्हिटॅमिन ‘सी’, व्हिटॅमिन ‘इ’ आणि ‘बी’ कॉम्प्लेक्सच्या गोळ्या, तसेच झंडू पंचारिष्ट, च्यवनप्राश अशा औषधांना मोठी मागणी असल्याचे राजेश ठाणावाला या विक्रेत्याने सांगितले.

करोनाच्या पहिल्या टप्प्यात मास्क, सॅनिटायझर, हातमोजे आदींची मोठी विक्री झाली. त्यानंतर काही काळ हायड्रोक्सीक्लोरोक्विन किंवा तत्सम गोळ्या प्रत्येक जण विचारत होता. आता प्रत्येकालाच प्रतिकार शक्तिवर्धक औषधे व गोळ्या हव्या आहेत. अ‍ॅलोपथीची औषधे नसतील तर आयुर्वेदिक औषधेही घेतली जात आहेत, असे मनुभाई शहा या औषध विक्रेत्याने सांगितले.

एरवी ज्या औषधांची अपवादाने विचारणा होते अशा अनेक आयुर्वेदिक औषधांची विचारणा सध्या आमच्याकडे होत असल्याचे आयुर्वेदिक औषधांची विक्री करणारे मिलिंद कुलकर्णी म्हणाले. अश्वगंधा, सफेद मुसळीपासून ते विविध आसवांपर्यंत प्रत्येक आयुर्वेदिक औषधाची मागणी वाढली आहे. मधुमेहाच्या रुग्णांकडून मेथी व आवळा पावडरीची मागणी खूपच वाढली असून दुकानात येणाऱ्या ग्राहकांमुळे आयुर्वेदाविषयीच्या आमच्याही ज्ञानात भर पडते, असे मिश्कीलपणे कुलकर्णी म्हणाले.

ग्राहकांच्या खिशाला कात्री

कालपर्यंत प्रत्येक रुग्णाला सखोल तपासून व तासभर माहिती घेऊन औषधे देणारे होमिओपॅथी डॉक्टरही आता फोनवरून पटापट प्रतिकारशक्ती वाढणारी औषधे सांगू लागले आहेत. अमुलनेही ‘आता प्रतिकारशक्तीसाठी अमुल दूध’ अशी जाहिरात सुरू केली आहे. त्यांचे हळदी दूधही बाजारात आले आहे. सध्या मुद्रित आणि दृक्-श्राव्य माध्यमांतून औषधांची जाहिरातबाजी मोठय़ा प्रमाणात होऊ लागली आहे. यात दुधात घालून घेण्याच्या शक्तिवर्धक औषधांचीच केवळ नव्हे तर वेगवेगळ्या मधविक्री करणाऱ्या कंपन्यांनीही आपलाच मध कसा शुद्ध व ‘गुणकारी’ आहे हे जाहिरातीतून सांगण्याची चढाओढ लावली आहे. करोनाच्या धास्तीपोटी ग्राहक राजा या जाहिराती बघून औषधविक्री करणाऱ्या दुकानांपुढे रांगा लावून उभा आहे आणि विक्रेतही ‘ये भी दवा ले के देखो’.. असे सांगत ग्राहकाच्या खिशात सहज हात घालताना दिसत आहेत.