देशातील साक्षरतेचे प्रमाण हे ६४.८ टक्के असताना मुस्लिमांमध्ये हे प्रमाण ५९ टक्के एवढे आहे. मुस्लीम समाजात उच्चशिक्षितांचे प्रमाण हे अवघे चार टक्के असून, शाळेतून गळतीचे प्रमाण सर्वाधिक असल्याबद्दल उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी बुधवारी चिंता व्यक्त केली.
काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी आयोजित केलेल्या मुस्लीम शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन उपराष्ट्रपतींच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते.
राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री के. रेहमान खान, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळुकर, राज्याचे अल्पसंख्याक विकासमंत्री नसिम खान आदी याप्रसंगी उपस्थित होते.
मुस्लीम समजातल्या शैक्षणिक अनास्थेचा परिणाम त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासावर होत असून, समाजातील ही अनास्था दूर करण्यावर अन्सारी यांनी भर दिला. मुस्लीम समाजानेही शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे येऊन मागासलेपण दूर करावे, असे आवाहनही त्यांनी केले. देशाच्या विकास प्रक्रियेत अल्पसंख्याक समाजाला पूर्णत: सहभागी करून घेतल्याशिवाय आपले राष्ट्र आधुनिक आणि विकसित राष्ट्र म्हणून पुढे येणार नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मुस्लीम समाजातील एकही विद्यार्थी शाळेबाहेर राहणार नाही यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री के. रेहमान खान यांनी व्यक्त केले. विविध शिष्यवृत्त्या, कर्ज योजना, स्पर्धा पूर्वपरीक्षा, पोलीस भरती पूर्वपरीक्षा, विविध शैक्षणिक संस्थांना अनुदान अशा विविध योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या सक्षमीकरणाबाबत राज्यात प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली.
मुस्लीम समाजात शैक्षणिक जागृती करण्याच्या उद्देशानेच ही परिषद भरविण्यात आल्याचे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले. दोन दिवसांच्या या परिषदेचा समारोप उद्या सायंकाळी केंद्रीय मनुष्यबळ आणि कायदामंत्री कपिल सिब्बल यांच्या हस्ते होणार आहे.