मुंबई महापालिकेकडे अहवाल सादर; खासगी वाहनांचा वापर कमी करण्याची सूचना
मुंबईतील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याबरोबरच प्रदूषणाला आळा घालणारी सुमारे दीड लाख कोटी रुपयांची योजना आखण्यात आली असून, ती मुंबई महापालिकेला सादर करण्यात आली आहे. या अंतर्गत बससाठी स्वतंत्र मार्गिका, उन्नत मार्ग, रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाण पूल आणि रेल्वेवर ओव्हरब्रीज बांधण्याची योजना आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक वाहतुकीचा वेग वाढल्यास त्यातील प्रवासी संख्या वाढून खाजगी वाहनांचा वापरही कमी होईल, अशी भूमिका या योजनेत मांडण्यात आली आहे.
महापालिकेकडे सादर करण्यात आलेल्या ‘मोबिलिटी प्लॅन’मध्ये वाहनांच्या संख्येवर र्निबध आणण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना मांडण्यात आल्या आहेत. यासाठी शहरातील पन्नास ट्रॅफिक जंक्शनचा तपशीलवार आढवा घेण्यात आहे. दिल्लीमध्ये प्रदूषण व वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सम व विषम तत्त्वानुसार वाहनांचे नियोजन करण्यात आले असून त्यामुळे तेथील प्रदूषणाची पातळी खाली आल्याचे दिसून तर आलेच, शिवाय वाहतुकीची कोंडीही कमी झाली आहे. दिल्लीप्रमाणे थेट सम-विषम योजना जरी थेट अमलात येणार नसली तरी वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणण्याचे सुतोवाच या योजनेत करण्यात आले आहे.
मुंबईची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मुंबईला पसरण्याला जागा नसल्यामुळे रस्त्यांचे जाळे कितीही वाढविले तरी विद्यमान वाहनांची संख्या व आगामी काळातील वाढणारी संख्या लक्षात घेता खासगी वाहनांच्या संख्येवर मर्यादा आणण्याचे धोरण स्वीकारावे लागेल असे मत या अहवालात मांडण्यात आले आहे. तसेच बेस्टच्या बसेससाठी स्वतंत्र मार्गिका तयार करून सार्वजनिक वाहतूक गतिमान करून अधिकाधिक प्रवाशांना त्यात सामावून घेण्याची भूमिका मांडण्यात आली आहे.
मुंबईत जवळपास ५२ टक्के लोक रल्वेने, २६ टक्के लोक बसने तर नऊ टक्के लोख रिक्षा व टॅक्सीने प्रवास करतात.
याशिवाय पाच टक्के खासही गाडय़ा आणि आठ टक्के बाईकने प्रवास करणाऱ्यांची संख्या आहे.
आजघडीला म्हणजे २०१५ मध्ये मुंबईत २६ लाख वाहने रस्त्यावर असून आगामी सदा वर्षांत यामध्ये दुपटीहून अधिक वाढ होण्याची शक्यता वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
याचा विचार केल्यास खाजगी वाहनांवर र्निबध आणणे गरजेचे असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या आराखडय़ासाठी २०३४ ची लोकसंख्या गृहीत धरून दीड लाख कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे.

नक्की काय होणार?
३४ स्वतंत्र बसमार्गिका तयार करण्यात येणार असून रेल्वेमार्गावरील पुलांवर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी २९ रेल्वे ओव्हरब्रिज व रस्त्यांवर नवीन १९ उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. प्रामुख्याने विनाअडथळा एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करण्यासाठी पूर्व उन्नत मार्गाच्या धर्तीवर सहा उन्नत मार्ग बांधण्यात येणार असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीनिवासन यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बस अथवा रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी जपानच्या धर्तीवर शंभर सायकल मार्गिका उभारण्यात येणार आहेत.