दीड महिन्यांत मशिनद्वारे पाण्याची विक्री; एका रुपयाला ३०० मि.लि. पाणी
प्रवाशांची तहान भागवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर उभारण्यात आलेल्या पाणपोईंची देखभालीअभावी दुर्दशा होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर पश्चिम रेल्वेने आपल्या सर्व स्थानकांवर ‘हाय-टेक वॉटर एटीएम’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दीड महिन्यात एका रुपयात ३०० मि.लि. पाणी पुरवणारी यंत्रणा पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर सुरू करण्यात येणार आहे. तसेच या यंत्राद्वारे पाण्याची एक लिटरची बाटली केवळ पाच रुपयांना मिळणार आहे. ‘इंडियन रेल्वे कॅटिरग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड’कडे (आयआरसीटीसी) या मशीन स्थानकांवर बसवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेच्या प्रत्येक स्थानकांवर प्रवाशांची तहान भागवण्यासाठी पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अनेक पाणपोई पाण्याविनाच असून त्यांची दुर्दशा झाली आहे. काही पाणपोईंच्या ठिकाणचे नळच गायब झाले असून या ठिकाणी प्रवाशांनी थुकदानी बनवलेली आहे. रेल्वे प्रवाशांना अधिक पसे मोजून रेल्वेच्या स्टॉलवरून बाटलीबंद पाण्याची खरेदी करावी लागते. याच धर्तीवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे. यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पुढाकार घेतला.
सध्या उपनगरीय स्थानकांपकी बोरिवली आणि खार स्थानकांवर ‘हाय-टेक वॉटर एटीएम’ मशीन आणण्यात आल्या आहेत. त्याच्या तांत्रिक बाजू तपासून लवकरच त्या प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण मुंबई विभागात या मशीन बसवण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मशीन असे असेल..
हे मशीन एटीएम प्रणालीप्रमाणेच असणार आहे. पसे मशीनमध्ये टाकल्यानंतर पाणी उपलब्ध होणार आहे. यात ३०० मि.लि. ते ५ लिटपर्यंत पाणी प्रवाशांना उपलब्ध केले जाईल. त्याची किंमत १ रुपयांपासून ते २० रुपयांपर्यंत असणार आहे. यात दोन पर्याय उपलब्ध करण्यात आले आहे. एकात केवळ पाणी उपलब्ध होणार असून दुसऱ्या पर्यायात बाटलीबंद पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचे दरही सध्याच्या बाटलीबंद पाण्याच्या तुलनेत फार कमी असणार असल्याचे सांगण्यात आले.