राज्यात १७ ते २१ मे या कालावधीमध्ये उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. आधीच उन्हाच्या काहिलीमुळे नागरिकांचे हाल होत असताना उष्णतेच्या लाटेमुळे कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, त्यामध्ये नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काय करावे
भरपूर पाणी प्यावे
हलके, पातळ सुती कपडे घालावेत
घरातून बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट, चपलांचा वापर करावा
घरी बनविण्यात आलेली लस्सी, लिंबूपाणी, ताक या पेय पदार्थांचे आवश्यकतेप्रमाणे सेवन करावे
पाळीव प्राण्यांना, गुरांना छावणीत ठेवावे. त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे
गरोदर महिला, आजारी व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी
काय करू नये
शिळे अन्न खाऊ नये, उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे
चहा, कॉफी, मद्य, कार्बोनेटेड थंड पेय यांचे सेवन टाळावे
दुपारी १२ ते ३ या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे
मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात