16 July 2019

News Flash

काळजी घ्या! रविवारी मुंबईच्या समुद्रात उसळणार उंच लाटा

वीकएण्डला पाऊस असेल तर हमखास अनेक मुंबईकर किनाऱ्यांवर धडकणाऱ्या लाटांचे तृषार अंगावर झेलण्यासाठी समुद्र किनारी गर्दी करतात.

पावसात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर भटकंती करण्याचा एक वेगळा आनंद असतो. त्यात वीकएण्डला पाऊस असेल तर हमखास अनेक मुंबईकर किनाऱ्यांवर धडकणाऱ्या लाटांचे तृषार अंगावर झेलण्यासाठी समुद्र किनारी गर्दी करतात. उद्या रविवारी समुद्र किनारी भटकंतीसाठी जाणाऱ्या मुंबईकरांनी आपली विशेष काळजी घेण्याची गरज आहे. कारण उद्या मुंबईतील समुद्राला १ वाजून ४९ मिनिटांनी भरती येणार असून यावेळी समुद्रात सर्वाधिक उंचीच्या ४.९७ मीटर उंच लाटा उसळणार आहेत.

हवामान विभागाने रविवारी मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे उद्या समुद्र किनारी जाणाऱ्या मुंबईकरांनी काळजी घेतली पाहिजे. सोमवारी सुद्धा दुपारी २ वाजून ३७ मिनिटांची मुंबईच्या समुद्रात ४.८९ मीटर उंचीच्या लाटा उसळतील असे महापालिकेने म्हटले आहे. शुक्रवारी भरतीच्यावेळी मरीन ड्राईव्हच्या समुद्राने तब्बल ९ मॅट्रीक टन कचरा बाहेर फेकला होता. मरीन ड्राईव्हच्या समुद्रातून इतक्या मोठया प्रमाणावर कचरा बाहेर येण्याची पहिलीच वेळ आहे. हा कचरा उचलण्यासाठी मरीन ड्राईव्हचा मार्ग बंद करावा लागला होता.

या वीकएण्डला शनिवार, रविवारी मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलला आहे. मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मागच्या आठवडयात शनिवार पासून सुरु झालेल्या पावसाचा जोर मंगळवारपर्यंत कायम होता. त्यामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. सखल भागात पाणी साचल्यामुळे ट्रॅफीक जाम होऊन रस्ते वाहतुकीचा वेग मंदावला तर रुळावर पाणी साचल्यामुळे मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती.

First Published on July 14, 2018 5:17 pm

Web Title: high tide in mumbai sea
टॅग Rain