मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठातील पदवीमुळे माजी उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे आणि भाजप विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झाले होते. आता जुनाच कित्ता महाविकास आघाडीच्या शासनानेही गिरवला असून नवनिर्वाचित उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे ज्ञानेश्वर विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत.

शासनाची मान्यता नसलेल्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये अशी आवाहने शासन करत असताना माजी उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांची अनधिकृत विद्यापीठातील पदवी वादग्रस्त ठरली होती. भाजप शासन २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर २०१५ मध्ये उघड झालेली तावडे यांच्या पदवीची बाब विरोधकांना अगदी  २०१९ मधील निवडणुकांच्या प्रचारापर्यंत पुरली.  आताचे सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या मुद्दय़ावर भाजपवर तोंडसुख घेतले होते. मात्र आता शिक्षणमंत्र्यांच्या वादग्रस्त पदवीच्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. तावडे यांनी ज्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून अभियांत्रिकी शाखेची पदवी घेतली त्याच ज्ञानेश्वर विद्यापीठाचे सामंत हे विद्यार्थी आहेत. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.

सामंत यांनी अभियांत्रिकी शाखेचे पदविकाधारक (डिप्लोमा) असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. राज्य मंडळाची बारावीची परीक्षा मार्च १९९१ मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी डिसेंबर १९९५ मध्ये पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केले. ऑटोमोबाइल अभियांत्रिकी क्षेत्रातील पदविकेचे शिक्षण त्यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठातून पूर्ण केले आहे. हे विद्यापीठ अनधिकृत आहे. त्यामुळे यापूर्वी तावडे यांच्यावर टीका करणारे आताचे सत्ताधारी सामंत यांच्याबाबत काय भूमिका घेणार, असा प्रश्न  निर्माण झाला आहे. दरम्यान, सामंत यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.

१९८० मध्ये स्थापना..

* डॉ. मनोहर आपटे यांनी १९८० मध्ये ज्ञानेश्वर विद्यापीठ सुरू केले. पुण्यातील एका सदनिकेत या विद्यापीठाचे कार्यालय होते.

* याला विद्यापीठ म्हणण्यात येत असले तरी ते फक्त संस्थेचे नाव आहे, त्याला विद्यापीठाचा दर्जा नाही असे या संस्थेनेच जाहीर केले होते.

* विद्यापीठाला आवश्यक त्या परवानग्या घ्याव्यात असे आठव्या नियोजन आयोगाच्या बैठकीत नमूद करण्यात आले होते.

* त्या वेळी डॉ. आपटे हेच नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. मात्र कोणत्याही शासकीय यंत्रणेची मान्यता न घेण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला होता.

* कोणत्याही कारणास्तव मुख्य प्रवाहात शिक्षण घेऊ न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही संस्था असल्याची स्थापकांची भूमिका होती.