मुंबई : सीबीएसई, आयसीएसईचे निकालही यंदा उंचावल्यानंतर राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या, एकूण निकालात झालेली मोठी वाढ यामुळे अकरावी प्रवेशाचा पेच निर्माण होणार आहे.

वाढलेल्या निकालामुळे नामांकित महाविद्यालयांतील पात्रता गुण (कटऑफ) किमान दोन ते पाच टक्क्यांनी वाढणार असून, या महाविद्यालयांतील प्रवेशासाठी स्पर्धा निर्माण होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच काही महाविद्यालयांतील जागा वाढवून द्याव्या लागण्याचीही शक्यता आहे.

गेल्या वर्षी ‘सीबीएसई’ आणि ‘आयसीएसई’च्या तुलनेत राज्य मंडळाच्या निकालात घसरण झाली होती. परिणामी राज्य मंडळाचे विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशांत मागे पडणार असे चित्र निर्माण झाले. त्यामुळे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांवर प्रवेश प्रक्रियेत अन्याय होऊ नये यासाठी काही महाविद्यालयांना दहा टक्के जागा वाढवून दिल्या होत्या. यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत पेच निर्माण होण्यामागे विद्यार्थ्यांचे वाढलेले गुण आणि उत्तीर्णाचे वाढलेले प्रमाण ही प्रमुख कारणे आहेत.

यंदा दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे. स्वाभाविकच या विद्यार्थ्यांचा कल नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेण्याकडे असेल. मात्र, वाढलेल्या गुणांबरोबर नामांकित महाविद्यालयांतील पात्रता गुणही वाढतील. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाणही वाढले असल्याने जास्त विद्यार्थी अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतील. त्यामुळे शिक्षण विभागाला नामांकित महाविद्यालयांतील जागा किमान दहा टक्के वाढवून द्याव्या लागतील, असे काही महाविद्यालयांतील प्राचार्यानी सांगितले.