कोरडय़ा आणि थंड वातावरणामुळे नागपूर व पुण्यात बस्तान बसवलेल्या स्वाइन फ्लूचे रुग्ण या वर्षी मुंबईत  सर्वाधिक आहेत. दोन वर्षे दबून राहिलेल्या स्वाइन फ्लूने या वर्षी वेगाने उसळी घेतल्याचे दिसत असून अवघ्या दहा दिवसांत मुंबईतील रुग्णसंख्या पुणे, नाशिकपेक्षा जास्त झाली असून नागपूरशी बरोबरी करत आहे. शहराबाहेरून आलेल्या रुग्णांचाही यात समावेश आहे.
स्वाइन फ्लूची साथ २००९ मध्ये सर्वप्रथम मुंबईतच सुरू झाली. मात्र त्यानंतर पुणे, नाशिक, नागपूरच्या कोरडय़ा वातावरणात स्वाइन फ्लूचे विषाणू अधिक वाढले. त्यानंतर मुंबईतील स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा प्रभाव कमी होत गेला. शहरात गेली दोन वर्षे तर स्वाइन फ्लूचे फारसे रुग्ण दिसून आले नव्हते. मात्र या वेळी पुन्हा एकदा मुंबईत स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. या वर्षी जानेवारीत नागपूरमध्ये सर्वप्रथम स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर औरंगाबाद, नाशिक, पुणे येथे रुग्णांचे निदान होऊ लागले. मुंबईत ४ फेब्रुवारीपासून ही साथ लक्षात येऊ लागली व त्यातही शहराबाहेरून उपचारांसाठी आलेल्यांची संख्या अधिक होती. मात्र सध्या शहरात असलेले कोरडे व थंड वातावरण या विषाणूंना मानवल्याचे दिसत आहे. अवघ्या आठवडाभरात शहरातील रुग्णसंख्या ९० झाली आहे. यात शहराबाहेरून आलेल्या ३३ रुग्णांचाही समावेश आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत १०० रुग्णांचे निदान झाले असून पुण्यातील रुग्णांची संख्या ८३ आहे. या दोन्ही ठिकाणी स्वाइन फ्लूमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या अधिक आहे. मुंबईत स्वाइन फ्लूचा एकही मृत्यू नाही. आतापर्यंत नोंदवले गेलेले सातही मृत्यू शहराबाहेरील रुग्णांचे आहेत. मात्र मुंबईतील रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत १४ रुग्ण वाढले असून त्यातील ४ रुग्ण शहराबाहेरील आहेत.
शहराबाहेरून आलेले रुग्ण, दाट लोकसंख्या तसेच निदानासाठी उपलब्ध यंत्रणा यामुळे रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. आतापर्यंत शहरातील दाखल झालेल्या रुग्णांपैकी पन्नास टक्के रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. या साथीकडे आरोग्य विभाग पूर्ण लक्ष ठेवत आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात एका दिवसात ५७ नवीन रुग्ण
राज्यात स्वाइन फ्लूचे गेल्या २४ तासांत ५७ नवीन रुग्ण आढळले आहेत. राज्यातील स्वाइन फ्लूच्या एकूण रुग्णांची संख्या ३१० झाली असून आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सात मृत्यू राज्याबाहेरील आहेत. १३३ रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आले. विविध जिल्ह्य़ांमध्ये १२० रुग्ण रुग्णालयात भरती असून त्यापैकी १३ रुग्ण कृत्रिम श्वसनयंत्रणेवर आहेत. नागपूरमध्ये १४, पुण्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.