विदर्भात मात्र उष्णतेची लाट; अकोला सर्वात तप्त

गेले तीन दिवस संपूर्ण राज्य तापवणारी काहिली बुधवारपासून ओसरू लागेल. विदर्भात मात्र उष्णतेची लाट कायम असून मंगळवारी अकोला शहराने ४६.५ अंश सेल्सिअस इतकी या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद केली. इतरत्र राज्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सियसने घट होईल.

देशातील सर्वाधिक म्हणजे ४७.५ अंश सेल्सिअस तापमान राजस्थानातील बारमेर येथे नोंदले गेले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर अकोल्याच्या तापमानाची नोंद आहे. राजस्थान व मध्य प्रदेशच्या पश्चिम भागांत मात्र पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटा राहणार आहेत.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून सातत्याने उष्णतेच्या लाटांनी महाराष्ट्रासह मध्य भारतातील बहुतांश भाग भाजून निघत आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भ तसेच मराठवाडय़ातील अनेक ठिकाणी तापमान ४५ अंश से.वर गेले. वध्र्यातील तापमान ४६ अंश होते तर नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती  व ब्रह्मपुरी येथेही कमाल तापमान ४५ अंश से.दरम्यान होते.

बुधवारी मात्र कमाल तापमानात काहीशी घट होणार असून बहुतांश ठिकाणी उष्णतेची लाट ओसरेल, असे केंद्रीय वेधशाळेने अंदाजात म्हटले आहे.

उष्णतेची लाट सध्या ओसरणार असली तरी ती अधेमधे पुन्हा येत राहील, असा अंदाज केंद्रीय वेधशाळेने उन्हाळ्याच्या दीर्घकालीन अंदाजपत्रकात व्यक्त केला होता.

मुंबईकर घामाने निथळले

  • मुंबईतील कमाल तापमान ३४ ते ३५ अंश से. दरम्यान असले तरी सापेक्ष आद्र्रता ६५ टक्क्य़ांहून अधिक आहे. त्यामुळे जाणवणारा उकाडा हा ४८ ते ५० अंश से. दरम्यान असतो.
  • त्यामुळे विदर्भ तसेच मराठवाडय़ाच्या तुलनेत कमाल तापमान फारसे दिसत नसले तरी घामाच्या धारांनी भिजलेल्या मुंबईकरांना जाणवणारे तापमान अधिक असते.