हिमालय पूल दुर्घटनेचा अहवाल शनिवारी सादर होणार

प्रसाद रावकर, मुंबई</strong>

एक महिन्यापूर्वी कोसळलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील हिमालय पूल दुर्घटनेची प्राथमिक चौकशी अंतिम टप्प्यात आली असून यात आणखी काही अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणाचा चौकशीचा अहवाल येत्या शनिवारी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे समजते. प्राथमिक चौकशीच्या अंतिम अहवालात आणखी काही अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला असून पुलांच्या संरचनात्मक तपासणी प्रक्रियेच्या काळात पूल विभागात कार्यरत अभियंत्यांचा त्यात समावेश असल्याचे समजते.

दादाभाई नौरोजी मार्गावरील बी. टी. लेन येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये जाणाऱ्या हिमालय पादचारी पुलाचा मोठा भाग १४ मार्च रोजी कोसळला आणि त्यात सहा ठार, तर ३१ जण जखमी झाले. या दुर्घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दक्षता विभागाचे प्रमुख विवेक मोरे यांना दिले होते. या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून त्याचा अहवाल मोरे यांनी २४ तासांमध्ये आयुक्तांना सादर केला होता. या दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशीचा अंतिम अहवाल पूर्ण होत आला आहे. हा अहवाल येत्या शनिवारी अजोय मेहता यांना सादर करण्यात येणार असल्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

शहर भागातील पुलांची संरचनात्मक तपासणी करण्याच्या कामासाठी पालिकेने तांत्रिक सल्लागार म्हणून डी. डी. देसाईज् असोसिएट इंजिनीयर कन्सलटंट अ‍ॅण्ड अ‍ॅनालेसिस प्रा. लि. या कंपनीची नियुक्ती केली होती. या पुलाची तपासणी करून पालिकेला अहवाल सादर केला होता. तसेच ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी या पुलाचे पालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयामार्फत सुशोभीकरण करण्यात आले होते. या सुशोभीकरणासाठी पूल विभागाचा निधी वापरण्यात आला होता. या सर्व बाबी विचारात घेऊन प्राथमिक चौकशीचा अंतिम अहवाल तयार करण्यात येत असून या अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे समजते.

तांत्रिक सल्लागाराची झालेली नियुक्ती, हिमालय पुलाबाबत त्याने पूल विभागाला सादर केलेला अहवाल, पूल विभागातील अभियंत्यांनी अहवालाची दखल घेतली की नाही, दरम्यानच्या काळात ‘स्वच्छ भारत अभियाना’साठी हिमालय पुलाचे करण्यात आलेले सुशोभीकरण आदींचा सर्वंकष अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात येत आहे. हिमालय पुलाच्या संरचनात्मक तपासणीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर तो कोसळल्याच्या कालावधीत पूल विभागात कार्यरत असलेल्या संबंधित अभियंते चौकशीच्या फेऱ्यात अडकले असून या पुलाशी थेट संबंधित असलेल्या अभियंत्यांवर अहवालात ठपका ठेवण्यात आल्याचे समजते. याप्रकरणी दोन अभियंत्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले होते. तसेच पोलिसांनी या प्रकरणात दोन अभियंत्यांना अटक केली. प्राथमिक चौकशीच्या अंतिम अहवालात ठपका ठेवण्यात आलेल्या आणखी काही अभियंत्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येण्याची शक्यता आहे. हा अहवाल येत्या शनिवारी पालिका आयुक्तांकडे सादर होण्याची शक्यता आहे.