21 October 2019

News Flash

गर्दीमुळे हिमालय पुलावरचा भार वाढला का?

चौकशी करण्याची अभियंत्यांची मागणी

चौकशी करण्याची अभियंत्यांची मागणी

हिमालय पुलावर एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर माणसांची गर्दी वाढल्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त भार पुलावर आला होता का?, त्यामुळे पुलाला हादरे बसून त्याच्या भाग कोसळला का? या दृष्टीने चौकशी करण्याची मागणी पालिकेच्या अभियंत्यांच्या संघटनेने केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातील हिमालय पूल दुर्घटनेची प्राथमिक चौकशी अंतिम टप्प्यात असून आणखी काही अधिकाऱ्यांवर ठपका येण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जाणार आहेत. या पुलाची संरचनात्मक तपासणी करणाऱ्या सल्लागाराला आणि पूल विभागातील दोन अभियंत्यांना आधीच अटक करण्यात आली आहे तर दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. दुर्घटनेचे नेमके कारण सापडलेले नसताना झालेल्या कारवाईमुळे पालिकेच्या अभियंत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेली गर्दी हेदेखील या पुलाच्या दुर्घटनेचे कारण असू शकते त्यामुळे त्या दृष्टीनेही तपास केला जावा, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स युनियनने केली आहे.

युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. संध्याकाळी गर्दीच्या वेळी पुलाचा भाग पडला, त्या वेळी या पुलावर नेमकी किती माणसे होती, याची कोणतीही माहिती नव्हती. मात्र जागतिक पातळीवर कुठेही पादचारी पूल कोसळण्यामागे गर्दी वाढल्यामुळे हादरे बसणे हे मुख्य कारण असल्याचे युनियनने आपल्या पत्रात म्हटले आहे. गर्दी वाढल्यामुळे पूल पडल्यास तो अचानक पडतो आणि त्याचे कोणतेही संकेत आधी मिळत नाहीत. त्यामुळे चौकशी करताना गर्दी हा मुद्दाही विचारात घेण्याचे निर्देश चौकशी समितीला द्यावेत, अशी मागणी अभियंत्यांनी केली आहे.

..म्हणून अहवालास विलंब

हिमालय पूल हा मध्य रेल्वेच्या उपनगरी गाडय़ांच्या सात फलाटांना जोडलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षांपूर्वी हा पूल बाहेरगावी जाणाऱ्या गाडय़ांचा ८ ते १८ क्रमांकाच्या फलाटांनाही जोडण्यात आला आहे. हा पूल बाहेरगावी जाणाऱ्या गाडय़ांच्या फलाटांना जोडताना पालिकेला कळवले होते का, याबाबतचे स्पष्टीकरण या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेला पत्र पाठवून मागितले आहे. पालिकेच्या चौकशी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत मध्य रेल्वेला याप्रकरणी दोनदा पत्र पाठवले आहे. हा पूल कोणत्या वर्षी बाहेरगावी जाणाऱ्या गाडय़ांच्या पुलाला जोडण्यात आला होता, त्यामुळे गर्दीत किती वाढ झाली, याचीही माहिती मागवण्यात आली आहे, अद्याप त्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वेने दिलेले नसल्यामुळे या दुर्घटनेच्या अहवालाला विलंब झाला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

First Published on April 22, 2019 1:15 am

Web Title: himalaya bridge collapse