मुंबईतील पवईतील हिरानंदानी रुग्णालयात उघडकीस आलेल्या किडनी रॅकेट प्रकरणी पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. मुंबई पोलिसांनी अटकेची कारवाई केलेले पाच डॉक्टर हे हिरानंदानी रुग्णालयात कार्यरत होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये  मुख्य कार्यकारी अधिकारी सुजित चटर्जी,  वैद्यकिय संचालक अनुराग नाईक, डॉ. प्रकाश शेटे, डॉ. मुकेश शेटे, डॉ. मुकेश शहा आणि प्रकाश शेट्टी यांना अटक करण्यात आली आहे. तब्बल ५० लाख रुपयांच्या मोबदल्यात मूत्रपिंड विकले जात असल्याचा प्रकार पवईतील हिरानंदानी रुग्णालयात उघडकीस आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला होता. पवईतील एल. एच. हिरानंदानी रुग्णालयात ब्रिजकिशोर जैस्वाल (४७) हा रुग्ण दोन्ही मूत्रपिंड खराब झाल्याने शस्त्रक्रियेसाठी दाखल झाला होता. जैस्वालने आपली पत्नी मूत्रपिंड देण्यास तयार असल्याचे सांगत सर्व आवश्यक चाचण्या पार पाडल्या. मात्र, बहुजन समाज पक्षाचे कार्यकर्ते महेश तन्ना आणि राजेश पवार यांनी रुग्णालयात धाव घेत या शस्त्रक्रियेला आक्षेप घेतला होता. जैस्वाल ज्या महिलेला पत्नी म्हणतो ती मुळात त्याची पत्नीच नसल्याचे तन्ना आणि पवार यांनी रुग्णालय प्रशासनाला सांगितले. तसेच मूत्रपिंड विक्रीचे हे संपूर्ण रॅकेटच असून  ५० लाख रुपयांत हा सर्व व्यवहार ठरला असल्याचा आरोप या दोघांनी केला होता. जैस्वाल याने रुग्णालयाकडे सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते.