रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना आज सकाळी रायगड पोलिसांनी मुंबई येथील त्यांच्या घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. यावेळी अर्णब गोस्वामी यांना पोलिसाकंडून मारहाण झाली असल्याचे स्वतः अर्णब गोस्वामी यांनी सांगितलं आहे. तसेच, त्यांचे वकील गौरव पारकर यांनी देखील पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे.

”अर्णब गोस्वामी यांच्या अटकेबद्दलची माहिती त्यांच्या पत्नीला देखील दिली गेलेली नव्हती. त्यांना दोन पोलिसांकडून मारहाण झाली आहे. शिवाय, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना धक्का दिला गेला व त्यांचे घर तीन तासांसाठी बंद करण्यात आले. त्यांच्या डाव्या हाताला दुखापत झालेली आहे आणि ज्या ठिकाणी दुखापत आहे, तिथे बांधलेली पट्टी देखील पोलिसांकडून काढण्याचा प्रयत्न झाला.” असा आरोप अर्णब गोस्वामीच्या वकिलाकडून करण्यात आला आहे. याशिवाय, अर्णब गोस्वामींच्या हाताला व पाठीत मारलं, त्यांना त्रास दिलेला आहे. अटकेवेळी त्यांना बेल्टने पकडलं आहे. त्यांच्या पाठीवर जखम झालेली आहे. असंही त्यांनी सांगितलं आहे.

अटक कशासाठी ?
वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ५ मे २०१८ रोजी अन्वय नाईक यांनी अलिबाग येथील राहत्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांनी चिठ्ठीत अर्णब गोस्वामी यांना आत्महत्येला जबाबदार धरण्यात आलं होतं. अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे. त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात तक्रार दाखल केली होती.

रिपब्लिकचा काय दावा-
पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवर रिपब्लिकने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. पोलिसांनी घरात जबरदस्ती घुसखोरी करत अर्णब गोस्वामी यांच्यासोबत धक्काबुक्की केल्याचा रिपब्लिकचा दावा आहे. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून धमकावण्यात आल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. कोणतीही अधिकृत कागदपत्रं नसताना आणि बंद झालेल्या केसमध्ये ही अटक झाल्याचा दावा आहे.